लातूर - जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सोमवारी निलंगा तालुक्यातील कोराळे गावात एकाच दिवशी कोरोनाचे 6 रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. मुंबई - पुण्याहून गावाकडे परतणाऱ्यांची संख्या जशी वाढत आहे, त्याचप्रमाणे रुग्णांची संख्यादेखील वाढत चालली आहे.
जिल्ह्यातील लातूर, उदगीर, चाकूर, जळकोट, निलंगा या तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. सोमवारी जिल्ह्यातून 23 नमुने तपासणीसाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले होते. पैकी 6 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे हे सहाही रुग्ण एकाच गावातील असून ते मुंबईहून परतले होते. रविवारी त्यांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते.
या सर्व रुग्णांना निलंगा येथील संस्थात्मक विलिनीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. आता जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 61 वर पोहोचली आहे. यापैकी दोघांचा मृत्यू झाला, तर 29 जण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या 30 जणांवर उपचार सुरू आहेत.