लातूर - जिल्ह्यातील निलंगा येथे एकाच दिवशी आठ रुग्णांचे अहवाल हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. हे आठ रुग्ण निलंगा येथे आढळून आले असले, तरिही त्यांच्यावर लातूर येथील विलासराव देशमुख वैद्यकीय शासकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे निलंग्यासह लातूर शहरात आज कमालीचा शुकशुकाट पहावयास मिळत आहे.
हेही वाचा... उत्तरेहून दक्षिणेला निघालेले यात्रेकरू निलंग्यातील मशिदीत; 12 पैकी 8 कोरोनाबाधित
दिल्ली, हरियाणा येथील धार्मिक कार्यक्रम आटोपून सध्याच्या संचारबंदीत मुळचे आंध्रप्रदेशातील करनुल जिल्ह्यातील १२ रहिवासी गावी परत निघाले होते. मात्र, निलंगा येथे दाखल होताच त्यांचा हरियाणा येथील वाहनचालक परत निघून गेला. त्यामुळे ते निलंगा येथे एका धार्मिक स्थळी अडकून पडले होते. या सर्वांची तपासणी केली असता त्यातील ८ जण कोरोनाग्रस्त आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये लातूर जिल्ह्यातील एकाचाही समावेश नसला तरिही जिल्ह्यात आठ जण आढळून आल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
हेही वाचा... #lockdown : लातूरात भाजी मंडईत सोशल डिस्टन्सिंगचे तीन-तेरा; प्रशासन हतबल
निलंग्यात तर अत्यावश्यक सेवा देखील बंद होत्या, तर लातूरातील मुख्य रस्ते, भाजी मंडईत कमालीचा शुकशुकाट होता. कालपर्यंत पोलीस प्रशसनाच्या अवाहनाला प्रतिसाद मिळत नव्हता. आज मात्र रस्त्यावर नागरिकांची वर्दळ नव्हती. त्यामुळे ८ कोरोनाग्रस्त आढळून आल्याने नागरिकांमध्ये एक प्रकारची धास्ती निर्माण झाली आहे. या कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्या १४ जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. सध्या त्या आठ जणांवर लातूर येथे उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.