लातूर- लातूरचे ग्रामदैवत असलेल्या सिद्धेश्वराच्या यात्रेला आज महाशिवरात्री पासून सुरुवात झाली आहे. महाशिवरात्री पासून पंधरा दिवस विविध धार्मिक आध्यात्मिक सांस्कृतिक कार्यक्रम येथील सिद्धेश्वर मंदिर परिसरात होणार आहे. त्या अनुषंगाने विश्वस्त मंडळाच्या वतीने मोठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.
हेही वाचा- 'गुगल पे'सारख्या अॅपवरून होणाऱ्या आर्थिक व्यवहारावरील शुल्क माफ
सिद्धेश्वर हे लातूरकरांचे ग्रामदैवत आहे. गेली 67 वर्षांपासून मोठ्या उत्साहाने याठिकाणी यात्रा महोत्सवाचे आयोजन केले जाते. यावेळी केवळ धार्मिकच कार्यक्रम नाही तर सांस्कृतिक कार्यक्रमाचीही जोडही या पंधरा दिवसातात होणाऱ्या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे. यात्रेच्या पूर्वसंध्येला विश्वस्त मंडळ तसेच धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी यात्रा ठिकाणांची पाहणी केली. सिद्धेश्वर मंदिर परिसरात तब्बल 200 स्टॉल उभारण्यात आले असून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात आहे.
आज महाशिवरात्री दिवशी सकाळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या हस्ते ध्वजारोहण होऊन झेंडा मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर सिद्धेश्वराचे दर्शन खुले करण्यात आले आहे. यात्रा परिसरात स्वच्छतेचे संदेश देणारे फलक लावण्यात आले आहेत. यात्रेच्या अखेरच्या दिवशी धर्मादाय कार्यालयाच्यावतीने शोभेच्या दारूची आतषबाजी करण्यात येणार आहे. त्यामुळे पंधरा दिवस चालणाऱ्या या यात्रा उत्सवाला सिद्धेश्वर विश्वस्त मंडळ सज्ज झाले आहे.
चौकाचौकातून बसची व्यवस्था
यात्रा दरम्यानच्या कालावधीत भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून शहरातील चौकाचौकातून महानगरपालिकेने बसची व्यवस्था केली आहे. शहरासह बाहेरील नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.