लातूर- कोरोनामुळे ओढवलेल्या परिस्थितीमध्ये सर्व उद्योग, व्यवसाय अडचणीत आले आहेत. शाळेवर आधारीत असलेल्या स्कूल बस चालकांचीही परिस्थिती बिकट आहे. 'विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक हेच आमचे ध्येय' असे घोषवाक्य असलेले शेकडो बसचालक सध्या असुरक्षित आहेत. सरकारने त्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिले नाही. शिवाय शाळा केव्हा सुरू होणार हे देखील माहिती नाही. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि बँकेचे हप्ते फेडणे अनिवार्य असल्याने बस चालकांनी बसमध्ये भाजीपाला विक्रीला सुरुवात केली आहे. स्कूल बसच्या माध्यमातून जेवढे उत्पन्न मिळत होते त्याहीपेक्षा अधिक उत्पन्न भाजीविक्रीतून बस चालकांना मिळत आहे.
मात्र, सध्या कोरोनाचे ग्रहण लागले आणि सर्वकाही विस्कळीत झाले. शासन दरबारी मदतीची मागणीही स्कूल बस चालकांनी केली होती. परंतु, याकडेही दुर्लक्ष झाल्याने या बस चालकांनीच एका विचाराने या संकटातून मार्ग काढला आहे. काही स्कूल बस या मनपाच्या कर्मचाऱ्यांना ने- आण करत आहेत, तर काहींनी भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करण्याचे ठरवले आहे.
शेतकऱ्यांच्या बांधावरून भाजीपाला खरेदी करायचा आणि थेट ग्राहकांच्या दारापर्यंत पोहोचता करायचा. यामुळे ग्राहकांनाही चांगला भाजीपाला मिळू लागला आणि या विक्रेत्यांना मोबदला. गेल्या दोन महिन्यांपासून शहरातील 8 ते 10 बस चालकांनी हा व्यवसाय सुरू केला आहे. व्हाट्सअॅपवर ग्राहकांची ऑर्डर घेवून बसमधून पुरवठा केला जातो. त्यामुळे या बस चालकांची गाडी रुळावर आली आहे. शिवाय भविष्यात शाळा सुरू झाल्या तरी हा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू ठेवण्याचा त्यांचा मानस आहे. दिवसाकाठी या भाजीपाला विक्रेत्यांची 8 ते 10 हजारांची उलाढाल होऊ लागली आहे. यामधून किमान दोन हजार तरी नफा मिळत असल्याचे श्रीकृष्ण पाडे यांनी सांगितले आहे.