लातूर - दिवाळी हा सण सबंध भारत देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. लातूर ग्रीन वृक्ष टीमने हा सण 'इको फ्रेंडली दिवाळी' साजरी करण्याचे आवाहन केले आहे. तसेच पर्यावरणपूरक व रसायनविरहित दिवाळी साजरी करण्याचा संदेश दिला आहे.
लातूर शहरातील मुख्य रस्त्यावरील गर्दीच्या ठिकाणी पर्यावरणपूरक, रसायनविरहित दिवाळी सण साजरा करण्याचे फलक दाखवत फुलांची रांगोळी, कागदी आकाशकंदील वापरा, असा संदेश 'लातूर ग्रीन वृक्ष टीम'ने दिला आहे.
- लातूर ग्रीन वृक्ष टीमचा पुढाकार -
हेही वाचा - Diwali 2021 : शिर्डीतील दिवाळीला वेगळे महत्व; दिव्यांनी उजळली साईनगरी
प्रदूषण केवळ फटाके वाजवल्यानेच होत नसून, प्लास्टिकचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात अधिक होत असल्याने प्रदूषण अधिक वाढत आहे. दिवाळीत सजावटीसाठी प्लास्टिकच्या माळा, पिशव्या, आकाशकंदील, दिवे, केमिकलयुक्त रांगोळी बाजारात विक्रीसाठी आहेत. याच्या वापराने प्रदूषण अधिक वाढत असून त्याऐवजी फुलांच्या माळा, कापडी किंवा कागदी पिशव्या, फुले, माती व खडीचा वापर रांगोळी काढण्यासाठी करावा. अंगणातील केमिकलयुक्त रांगोळीनंतर माती, पाणी, गटारात टाकली जाते. पर्यायाने पाण्यात केमिकल मिसळल्याने प्रदूषण होते. कमी आवाजाची फटाके वाजवावीत जेणेकरुन आजारी व वृद्धांना त्रास होणार नाही. शिवाय ध्वनी व वायू प्रदूषण टाळता येऊ शकते, असे डॉ. पवन लड्डा यांनी सांगितले. 3
- पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन -
'लातूर ग्रीन वृक्ष टीम'च्या माध्यमातून 2015 पासून ध्वनी व वायू प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. देशात केवळ दिवाळीत जवळपास 20 ते 30 टक्के प्रदूषण अधिकचे वाढते. निसर्गाने आपणास भरपूर दिले आहे. आपणही निसर्गाचे संवर्धन करणे काळाची गरज असून, एकंदरीत ही दिवाळी 'इको फ्रेंडली दिवाळी' साजरी करुन निसर्गाच्या जवळ जाण्यास सुरुवात करावी, असे आवाहन लातूर ग्रीन वृक्ष टीमचे डॉ. रमेश भराटे यांनी केले आहे.
हेही वाचा - बेघरांना दिवाळीचे साहित्य भेट; सांगली पोलिसांनी स्तुत्य उपक्रम