लातूर - येथील राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या व्यवस्थापन विभागाने क्रांतिकारक निर्णय घेतला असून सर्वसामान्य विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होणार आहे. या वर्षांपासून ५ टक्के असलेली कोटा पद्धत रद्द करण्यात आली असून केवळ गुणवत्तेवरच विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. या वर्षीपासून या नियमाची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे अनिरुद्ध जाधव यांनी सांगितले.
शिक्षणासाठी लातूरची ख्याती संबंध राज्यभर आहे. मुलांचे शिक्षण चांगल्या महाविद्यालयातच व्हावे, असा पालकांचा अट्टाहास असतो. गेल्या अनेक वर्षांपासून येथील राजर्षी शाहू महाविद्यालयात कोटा पद्धतीच्या माध्यमातून ५ टक्के विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे अधिकार महाविद्यालयाच्या व्यस्थापणाकडे होते. त्यामुळे लोकप्रतिनिधी, अधिकारी, राजकीय नेते यांच्याकडून शिफारशी केल्या जात होत्या. शिवाय अनेकवेळा दबाव तंत्रांचाही वापर केला जात होता. या सर्वांच्याच अपेक्षा पूर्ण होत नसल्याने संस्थेविषयी रोष वाढत जात असल्याने व्यवस्थापन समितीने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे संस्थेच्या अधिकारातील ५ टक्के प्रवेशही आता गुणवत्तेच्या आधारे दिले जाणार आहेत.
ही सर्व पद्धती शासनाच्या धोरणानुसार राहणार असल्याचे संस्थेचे सचिव अनिरुद्ध जाधव यांनी सांगितले आहे. या शैक्षणिक वर्षांपासून या पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे. त्यामुळे प्रवेशादरम्यान कुणीही शिफारस करू नये, असेही महाविद्यालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे.