लातूर - लोकसभा निवडणुकांचा निकाल काही दिवसांनी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री तथा रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी निकालाबाबात आश्चर्यकारक भविष्यवाणी केली आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे दुष्काळ पाहणीच्या अनुशंगाने लातुरात आले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत मित्र पक्षाचा एकही पदाधिकारी त्यांच्या समवेत नसल्याची चर्चा रंगली होती.
देशात एनडीएची सत्ता स्थापन होईल. परंतु, २०१४ प्रमाणे स्थिती राहणार नाही. गतवेळी प्रत्येक उमेदवार हा २ ते अडीच लाखाच्या मताधिक्याने विजयी झाले होते. यंदा स्थिती बदलली असून सत्ता येईल परंतु अपेक्षित मताधिक्य मिळेल याबाबत शंका आहे. शिवाय मित्रपक्षाचे समाधान होईल, असे जागावाटप केले नाही, असे विधान रामदास आठवले यांनी केले आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये एका जागेची अपेक्षा होती. मात्र, ती देण्यात आली नाही. राज्यसभेतील जागा कायम ठेवण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. शिवाय सत्ता आल्यावर राज्यात मंत्रीपद देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले. यंदा निवडणुकांमध्ये सर्व विरोधक एकवटले होते. त्यामुळे काही ठिकाणी मताधिक्य कमी होईल तर काही ठिकाणी वाढेल. गतवेळी मोदींच्या नावाची हवा होती तर यावेळी कामाची-कामाची हवा आहे. योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेला मिळाला आहे. या कामाचे मोजमाप जनता करेलच आणि मोदी सरकारसाठी स्पष्ट बहुमत मिळेल, असा आशावाद असल्याचेही आठवले म्हणाले.
सध्या तरी एनडीए सोडून दुसरा विचार नाही
विरोधक एकवटले असले तरी अनेक राज्यामध्ये त्यांच्यात मतभेद आहेत. त्याचा लाभही महायुतीलाच होणार आहे. त्यामुळे बहुमत मिळेल परंतु, मताधिक्य कमी प्रमाणात असेल. लोकसभेत अपेक्षित जागा मित्र पक्षाला मिळाली नसली तरी राज्याच्या सत्तेमध्ये योग्य ८ ते १० जागा मिळतील असा आशावाद आहे. त्यामुळे एनडीए सोडून सध्या तरी काही वेगळा विचार नसल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.