लातूर - केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या कविता सर्वश्रुत आहेत. मात्र, औसा तालुक्यात दुष्काळ पाहणीदरम्यान पोलीस नाईक दिलीप लोधे यांनी दुष्काळाची दाहकता कवितेमधून मांडल्यामुळे रामदास आठवलेही आश्चर्यचकित झाले. त्यांनी कवितेतून मोदी सरकारच कसे सत्तेवर येणार हे सांगितले आहे.
रविवारी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी औसा तालुक्यातील दुष्काळाची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडून जनावरांना चारा, पिण्याचे पाणी, शेत-रस्ते, विद्युत पुरवठा यासारख्या मागण्या मांडल्या. मात्र, औसा पोलीस ठाण्यात पोलीस नाईक पदी रुजू असलेले दिलीप लोभे यांनी आठवलेंच्या कवितांमधून प्रेरित होऊन सुचलेल्या कवितेचे सादरीकरण करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावेळी दुष्काळ आणि सरकारची भूमिका त्यांनी कवितेमधून सादर केली. सर्व शेतकऱ्यांचे दुष्काळाबाबत काय म्हणणे आहे आणि सरकारने काय भूमिका घ्यावी याचा बोध होता. तर रामदास आठवले यांनीही काँग्रेसवर टीका करीत मोदीच पंतप्रधान पदाचे दावेदार कसे आहेत, हे पटवून दिले. शिवाय ग्रामीण भागातही आपल्यासारखा कवी तयार झाल्याचे समाधान व्यक्त केले.
विविध समस्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडणार आहे. त्यामुळे आता पाहणी नाही, तर प्रत्यक्ष मदत देणे गरजेचे असल्याचे आठवले यावेळी म्हणाले.