लातूर - जिल्ह्याचे ग्रामदैवत असलेल्या सिद्धेश्वराच्या यात्रेस सोमवारपासून प्रारंभ होत आहे. सिद्धेश्वर मंदिर परिसरात यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. यावेळी महाशिवरात्री ही सोमवारी आल्याने यात्रेला एक वेगळे महत्व प्राप्त झाले आहे.
दर्शनरांग आणि संबंध मराठवाड्यातून येणाऱ्या भाविकांसाठी दर्शनरांग व इतर सोई-सुविधा मंदिर ट्रस्टच्यावतीने देण्यात येणार आहेत. दरवर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी यात्रेला प्रारंभ होतो. १५ दिवस सुरू राहणाऱ्या या यात्रेदरम्यान धार्मिक कार्यक्रमांबरोबर सामाजिक उपक्रमही राबविले जाणार आहेत. भव्य झेंडा मिरवूणुकीने उद्या या यात्रेला प्रारंभ होत आहे.
सिद्धेश्वर हे लातूर जिल्ह्याचे ग्रामदैवत असून या यात्रेसाठी संबंध मराठवाड्यातून भाविक लातुरात दाखल होतात. त्याअनुषंगाने महामंडळाच्यावतीने अधिक बसेसही सुरू करण्यात येणार आहेत. गेल्या ८ दिवसांपासून मंदिर परिसरात विविध स्टॉल थाटले जात आहेत. मनपाच्याकडून या ठिकाणी स्वछता मोहिमही राबवली जात आहे. दरम्यानच्या कालावधीमध्ये पशु प्रदर्शन, कृषी प्रदर्शन, कुस्त्यांची दंगल यासारखे कार्यक्रम घेतले जाणार आहेत.
जागतिक महिला दिनानिमित्त ८ मार्च रोजी महिला मेळावा होणार आहे. केवळ धार्मिक कार्यक्रमच नाहीतर विविध प्रकारचे कार्यक्रम राबवून यात्रेचे वेगळेपण जपण्याचा प्रयत्न देवस्थान कमिटीच्यावतीने करण्यात येत आहे. काळाच्या ओघात भाविकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे यंदा आनंदमेळावा देखील विस्तीर्ण जागेत होत आहे. यात्रेच्या पुर्वसंध्येपासून मंदिर परिसरात भाविकांची गर्दी होऊ लागली आहे.