लातूर- कोरोना विषाणूमुळे संसर्गित झालेले रुग्ण मराठवाड्यामधील जिल्ह्यामध्ये आढळून आले आहेत. लातूरमध्ये एप्रिल महिन्याच्या सुरवातीला आठ कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. कोरोनाचा प्रसार ग्रामीण भागात होऊ नये म्हणून सतर्कता घेतली जातेय. अहमदपूरच्या पोलीस उपअधीक्षक डॉ.अश्विनी पाटील यांच्या संकल्पनेतून अहमदपूर तालुक्यातील प्रमुख गावांवर ड्रोन कॅमेऱ्याची नजर असणार आहे.
संभाव्य कोरोनाबाधित गावात प्रवेश करुन नये म्हणून गावांनी गावबंदी केली आहे. संचारबंदीच्या नियमांचे ग्रामीण भागात पालन होते का याची पाहणी करण्यासाठी अहमदपूर पोलीस उपअधीक्षक डॉ.अश्विनी पाटील यांच्या संकल्पनेतून तालुक्यातील हाडोळतीसह परिसरातील गावांची पाहणी ड्रोनच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
ड्रोनद्वारे शहराची पाहणी केल्यामुळे ग्रामस्थ बस स्टँड, पारावर एकत्र आले आहेत का? याची पाहणी करणे सहज शक्य असल्याचे अश्विनी पाटील यांनी सांगितले. आतापर्यंत लातूर, निलंगा, उदगीर या शहराच्या ठिकाणी अशाप्रकारे ड्रोनने शहरांची पाहणी करण्यात आला होती.
संचारबंदीच्या नियमांची अंमलबजवणी करण्यासाठी पोलीस प्रशासन विविध उपाय राबवत आहे. जिल्हाबंदीसाठी सीमांवर पोलीस बंदोबस्त तैनात आहेत. ग्रामीण भागातही ड्रोनद्वारे पाहणी होत असल्याने नियमांचे काठेकोरपणे पालन करण्यास मदत होणार आहे.