लातूर - लॉकडाऊच्या तिसऱ्या टप्प्यात निर्बंधांवर प्रमाणात शिथिलता देण्यात आली असून, ऑरेंज झोनमध्ये असलेल्या लातूर जिल्ह्यात उद्योग-व्यवसायासह दारूची दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील उदगीर शहरात 10 कोरोनाबाधित रुग्ण असल्याने येथील कर्फ्यू कायम राहणार आहे. मात्र दारुच्या दुकानांना उघडण्याची परवानगी मिळाल्यामुळे, सोमवारी सकाळी आठपासूनच दुकानांसमोर नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. दहा वाजेनंतर पोलीस बंदोबस्तात दारू विक्रीला सुरवात झाली होती. यावेळी दारू घेताना प्रत्येकजण सोशल डिस्टन्सचे पालन करीत होता हे विशेष!
तब्बल दीड महिन्यानंतर आज शहरासह ग्रामीण भागातील दारूची दुकाने खुली करण्यात आली आहेत. शिवाय एमआयडीसी तसेच शहरातील व्यावसायिकांना दुकाने उघडण्यास जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी परवानगी दिली आहे. त्यानुसार शहरात आज काही प्रमाणात का होईना वर्दळ पाहवयाला मिळाली. शिथिलता देण्यात आली असली तरी नागरिकांनी सोशल डिस्टन्सचे पालन करणे गरजेचे आहे. सकाळी शहरातील दारूची दुकाने उघडण्यापूर्वीच नागरिकांनी गर्दी केली होती. दुकाने उघडण्यापूर्वी पोलीस दुकानाच्या ठिकाणी दाखल झाले होते. एका रांगेत उभे राहून सर्व मद्यप्रेमी दारू खरेदी करीत असल्याचे चित्र आज पाहवयास मिळाले.
तर दुसरीकडे, जिल्ह्यातील केशकर्तनालयेही सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असली तरी आज आठवड्याची सुट्टी असल्याने ही दुकाने बंदच होती. मात्र, दीड महिन्यानंतर काही प्रमाणात का होईना उद्योग-व्यवसाय सुरू झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तसेच यामुळे जिल्ह्यातील अर्थचक्रही फिरणार आहे, हे नक्की.
हेही वाचा : दिलासादायक..! कोरोना रुग्णांच्या संपर्कातील 142 जणांचे अहवाल निगेटिव्ह