लातूर - कृषी व्यवसायाशी निगडीत असलेल्या बाबींना शिथिलता देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याअनुषंगानेच राज्यमंत्री संजय बनसोडे आणि पालकमंत्री अमित देशमुख यांच्या सूचनेप्रमाणे उपनिबंधकांच्या उपस्थितीत उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती मंगळवारी सुरू करण्यात आली होती. मात्र, ठरवून दिलेल्या नियमांचे पालन न झाल्याने सोशल डिस्टन्सिंगचे तीन-तेरा वाजल्याचे पाहावयास मिळाले.
गुढीपाडव्यानंतर लॉकडाऊनमुळे बाजरपेठा बंद आहेत. त्यामुळे रब्बीचा शेतीमाल निघूनही शेतकऱ्यांच्या पदरी पैसा पडत नव्हता. परिणामी शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत असल्याने कृषी उत्पन्न बजार समित्या सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र, याबरोबरच एक नियमावलीही ठरवून देण्यात आली आहे. शेतीमालाबरोबर केवळ शेतकऱ्यानेच यावे, एकावेळी एकच माल घेऊन यावा, त्यामुळे गर्दी कमी होईल आणि नियमांचे पालन होईल.
परंतु, अनेक दिवसानंतर बाजार समिती सुरू झाल्याने उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे नियमांचे पालन तर झालेच नाही शिवाय सोशल डिस्टन्स न ठेवता व्यवहार झाले. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, नियमांचे पालन न केल्याने धोका अधिक वाढत आहे.
व्यवहार सुरू झाल्याने शेतकऱ्यांचा काही प्रमाणात का होईना प्रश्न मार्गी लागणार आहे पण आवश्यकता आहे ती नियमांच्या अंमलबजावणीची. चार दिवसांनी लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू होणार आहे. त्यामुळे कशी खबरदारी घेतली जाणार हे पाहावे लागणार आहे.