लातूर - कोरोनामुळे सर्वत्र कडक लॉकडाऊन सुरू आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद आहे. मात्र, लातूर जिल्ह्यातील चाकूर नगर पंचायतीचे कर्मचारी-अधिकारी ओली पार्टी करण्यात दंग असल्याचे समोर आले. चाकूर शहराजवळील एका हॉटेलमध्ये चाकूर नगरपंचायतचे कर्मचारी मद्यपान करून मटणावर ताव मारत असल्याचे व्हिडिओ चित्रीकरण काही नागरिकांनी केले आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.
अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई करा -
या व्हिडिओमध्ये चाकूर नगरपंचायतचे स्वच्छता-पाणी पुरवठा अभियंता प्रमोद कास्टेवाड, दिवाबत्ती कर्मचारी मुकुंद मस्के, लिपीक व्यंकट सूर्यवंशी, स्वच्छता-घनकचरा प्रमुख सचिन होळंबे दिसत असल्याचा दावा केला जात आहे. चाकूर येथील नागरिक अजय धनेश्वर, लक्ष्मण धोंडगे, खालिद हसनमारे, अजित घंटेवाड यांनी हा व्हिडिओ काढला आहे. दोषी असणाऱ्या या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्याकडे केली आहे.
नियम फक्त नागरिकांसाठीच -
लॉकडाऊन, संचारबंदीच्या काळात हेच अधिकारी-कर्मचारी चाकूरमधील नागरिकांना वेठीस धरतात. स्वतः मात्र हॉटेलमध्ये जाऊन मद्यपानाची पार्टी करतात, असा आरोप निवेदनकर्त्या नागरिकांनी केला आहे. व्हिडिओमधील कथित अधिकारी-कर्मचारी हे दारूच्या बाटल्या लपवताना आणि मटणावर ताव मारताना स्पष्ट दिसत आहेत.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे यांनी नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना गुरुवारी पत्र पाठवून त्या कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यास सांगितले आहे. त्यानुसार मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांनी 'त्या' चौघांना कारणे दाखवा नोटीसा देऊन दोन दिवसात याचा खुलासा मागितला आहे.
हेही वाचा - महाराष्ट्रात आता 15 मेपर्यंत कडक निर्बंध