लातूर - दरवर्षीच्या पाणीटंचाईत खरी चांदी कोणाची होत असेल, तर ते टँकरने पाणीपुरवठा करणाऱ्या व्यावसायिकांची. मात्र, यंदा त्यांनाही मोठ्या प्रमाणात फटका बसलाय. मुबलक प्रमाणात पाणी असताना देखील ही परिस्थिती ओढावली आहे.
शहरातून मूळ गावी जाणाऱ्यांची संख्या हजारोंवर आहे. त्यामुळे शहरातील पाण्याची मागणी घटलीय. तसेच मजूर नसल्याने बांधकामं देखील खोळंबली आहेत. जिल्ह्यातील पाणीटंचाई स्थानिकांसाठी नवी नाही. मात्र, यंदा पाणीटंचाईच्या झळा कमी असल्या तरीही मे महिन्याच्या अखेरीसही टँकरची मागणी कमी असल्याचे चित्र आहे.
मागील काही वर्षांपासून टँकर आल्यानंतर नागरिकांच्या मोठ्या रांगा लागत होत्या. एखादा टँकर मागवण्यासाठी देखील थांबावे लागत होते. तसेच टँकरचे दर हजारोंच्या घरात होते. त्यामुळे एक रुपया लिटरप्रमाणे पाणी विकत घेण्याची नामुष्की ओढावली होती. मात्र,यावर्षी महामारीमुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम या व्यवसायावर झाला आहे. यामुळे आता वाहतुकीचा आणि चालकाचा पगार काढणे देखील कठीण झाले आहे.
शहरातील नागरीकांनी गाव जवळ केलं आहे. तर हॉटेल, बांधकाम, इतर व्यवसाय देखील ठप्प आहेत. शहरात खासगी टँकरची संख्या 150 वर आहे. शहरातील वेगवेगळ्या भागांत या टँकरचे पॉईंट आहेत. मात्र, सध्या मागणी नसल्याने वाहतूक खर्चही निघणे अवघड झाले आहे. मनपाच्या वॉटर बोर्डमधून देखील एकही टँकर धावत नाहीय. केवळ रस्त्याच्या मध्यभागी असणाऱ्या झाडांची जोपासना करण्यासाठी एक टँकर कार्यरत आहे.
बांधकाम क्षेत्रात वाळू, सिमेंट, विटा याचे दर गगनाला भिडल्याने अनेकांनी कामाला ब्रेक दिला आहे. त्यामुळे मागणी घटली असून याचा व्यावसायिकांवर मोठा परिणाम झाला आहे. ज्या ठिकाणी 100 हून अधिक टँकर रस्त्यावर धावायचे, त्याच ठिकाणी आज फक्त 10 ते 15 टँकर आहेत. यंदा पाणी उपलब्धत आहे. त्याचे दरही कमी आहेत. मात्र, पाण्याच्या टँकरला मागणी नाहीय. त्यामुळे दुष्काळी भागात टँकरचा व्यवसाय अडचणीत आला आहे. दरवर्षी पाणी विक्रीच्या माध्यमातून पैसा कमावणारे व्यवसायिक ग्राहकांच्या शोधात आहेत.