लातूर - लग्नाच्या वऱ्हाडाचा टेम्पो आणि शिवशाही बस यांची धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. ही घटना लातूर - बार्शी राज्यमार्गावरील मुरुडजवळ घडली. या अपघातात वऱ्हाडातील एका महिलेचा मृत्यू झाला. तर, ३६ पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर येथून लग्नाच्या वऱ्हाडाचा टेम्पो लातूरकडे जात होते. त्यावेळी अहमदपूर - पुणे या मार्गावर धावणाऱ्या शिवशाही बसची आणि टेम्पोची समोरासमोर धडक झाली. यात अफरीन नसीर पठाण (वय २४) या महिलेचा जागीच मृत्यू झाला. ३६ पेक्षा अधिक लोक यात जखमी झाले आहेत.
जखमींमध्ये महिला, बालकांचा समावेश आहे. सर्व जखमींना मुरुड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना लातूर येथे पाठविण्यात आले.