लातूर - कायद्याचा धाक दाखवून गुन्हा दाखल करतो, अशा धमक्या देऊन अनेकांना लुटले असल्याची घटना औसा तालुक्यातील देवतळा येथे घडली आहे. याप्रकरणी एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विठ्ठल चव्हाण असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
विठ्ठल चव्हाण हा गावातील शासकीय नोकरीस असलेल्या व्यक्तींना पोलिसांत गुन्हा दाखल करतो म्हणून खंडणी मागायचा. एवढेच नाही, तर कधी बायकोवर बलात्कार केला म्हणून तर कधी मारहाण केली म्हणून गुन्हा नोंद करण्याची धमकी द्यायचा. सरकारी नोकरी गमवावी लागेल, या धास्तीने अनेकजण त्याच्या जाळ्यात अडकले. गेल्या पंधरा दिवसांपासून गावातील सचिन रुपचंद चव्हाण (32) यालाही पन्नास हजार रुपये दे, अन्यथा तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा नोंद करतो, अशी धमकी देत होता. सततच्या त्रासाला कंटाळून सचिन चव्हाण याने भादा पोलीस ठाण्यात विठ्ठल चव्हाणच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार औसा येथे सचिन चव्हाणकडून 5 हजार रुपये खंडणी घेताना विठ्ठल यास रंगेहात पकडण्यात आले आहे. गावातील शिक्षक, पोलीस एवढेच नाही, तर न्यायाधीशांकडूनही पैसे वसूल केले आहेत. गुरुवारी मात्र, औसा येथे विठ्ठल यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शुक्रवारी कोर्टात हजर केले असता त्याला 12 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अपंग असणाऱ्या विठ्ठल याने गावातील अनेकांना अशाप्रकारे लुटले आहे. मात्र, त्याचा अतिरेक झाला आणि सचिन चव्हाण यांच्या तक्रारीवरून त्यास जेरबंद करण्यात आले आहे.
गावात जो शासकीय नोकरीला आहे, त्यालाच विठ्ठल टार्गेट करीत होता. शासकीय नोकरदारांनाही नोकरीची चिंता असल्याने त्याने मागितलेली रक्कम देऊन तोंड बंद करीत होते. मात्र, विठ्ठल याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असल्याने सचिन चव्हाण याने अखेर तक्रार नोंद केली होती.
पैशापुढे नात्याचीही कदर राहिली नाही-
एखाद्या नोकरदाराला जाळ्यात ओढण्यासाठी विठ्ठल चव्हाण हा बायकोवरच बलात्कार केल्याची तक्रार देतो, म्हणून धमकी द्यायचा. केवळ पैसा कमावणे हाच त्याचा उद्देश राहिल्याने त्याने नात्याचीही कदर ठेवली नव्हती.अखेर त्याच्या पापाचा घडा भरला आणि जेलची वारी करणे अटळ झाले. मात्र, त्याच्यावर कारवाई करण्यात आल्याने देवतळा ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.