लातूर - उदगीर येथील आणखी एका रुग्णाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात सध्या 34 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. लातूर, उदगीर आणि औसा तालुक्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. मात्र, गेल्या आठवड्याभरापासून रुग्णांची संख्या मंदावली असल्याने दिलासादायक वातावरण आहे.
पुणे-मुंबईहून येणाऱ्या नागरिकांमुळे जिल्ह्यात कोरोनाचा धोका कायम आहे. सोमवारी लातूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 28 नमुने तपासणीसाठी दाखल झाले होते. पैकी 22 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. एकाचा अहवाल प्रलंबित असून एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हा पॉझिटिव्ह रुग्ण उदगीर तालुक्यातील आहे.
दिवसेंदिवस रुग्णांची संख्या घटत असली तरी नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. सोमवारपासून लॉकडाऊनच्या नियमात शिथिलता आणल्याने सर्व उद्योग व्यवसाय सुरु झाले आहेत. मात्र, तरी शहरासह ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिल्या आहेत.