लातूर - निलंग्यात गुलाबाचे फुल देत हात जोडून घराबाहेर न पडण्याची विनंती निलंगा पोलीस करत आहेत. कितीही समजावून सांगितलं, तरीही कोणीही ऐकत नसल्याने शेवटी हात जोडून विनंती करण्याची वेळ निलंगा पोलिसांवर आली आहे. मोटारसायकल, चारचाकी वाहनधारकांना विनंती करताना पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण आकमवाड यांच्यासह प्रणव काळे, शितलकुमार सिंदाळकर, बाळासाहेब नागमोडे आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
ग्रामीण भागासह शहरातील नागरिक कोरोनोग्रस्त होऊ नयेत, म्हणून संपूर्ण देशात संचारबंदी लागू केली. परंतु, जनता ऐकायला तयार नाही घरामध्ये न बसता लोक बिनधास्तपणे रस्त्यावर फिरत आहेत. पोलिसांनी अनेकांना खाक्या दाखवल्या, दंड आकारला, काठ्या घातल्या तरीसुद्धा लोक ऐकत नाहीत. यामुळे निलंगा पोलिसांनी वेगळीच शक्कल लढवत मोटारसायकलवर फिरणाऱ्यांना गुलाबाचे फुल देऊन स्वागत करत घरी बसा, अशी विनंती पोलिसांनी केली आहे.