लातूर - जिल्ह्यात गुरुवारी 7 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली असून, दोघांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. लातूर, औसा, उदगीर आणि निलंगा तालुक्यात रुग्ण आढळून आले आहेत. गुरुवारी 127 व्यक्तींचे अहवाल तपासणीसाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाले होते. पैकी 112 जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत 7 जणांचे पॉझिटिव्ह आणि 8 संशयितांचे अहवाल हे अनिर्णित आहेत.
लातूर शहरातील भोई गल्लीत 2, कापड लाईनमध्ये एक तर सुतमील रोडला एक रुग्ण आढळला आहे. औसा तालुक्यातील मळकुंजी, उदगीर तालुक्यातील एकुरगा तर निलंगा तालुक्यातील कासार बालकुंडा येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. सध्या 67 रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर गुरुवारी रेणापूर तालुक्यातील कामखेडा येथील एकाच घरातील दोघांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आतापर्यंत जिल्ह्यात एकूण रुग्ण 217 आढळून आले होते. त्यापैकी 139 रुग्णांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला असून 67 जणांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात 11 जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाच्या चिंतेत भर पडत असून नागरिकांनी योग्य काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केले आहे.