लातूर - लहान वयात असताना घरातून निघूनच जातो...हाताला काम मिळाल्याशिवाय घराकडे फिरकणार नाही, अशा एक ना अनेक आणाभाका घेतलेल्या आपण ऐकल्या असतील. मात्र केवळ बोलण्यावर न थांबता उदगीर तालुक्यातील देवर्जन हाणमंतवाडी येथील बालाजी येलमटे यांनी घरातून काढता पाय घेतला आणि थेट शहर गाठले. त्यानंतर तब्बल २० वर्षे ते घरी परतले नाहीत. पुढे ते अचानक घरी अवतरले तेही चक्क नागासाधुच्याच्या वेशात. या त्यांच्या वेशभुषेमुळे त्यामुळे ग्रामस्थांचा नाहीतर त्यांच्या घरचेही आश्चर्य व्यक्त करीत आहेत.
या संपूर्ण प्रवासाची माहिती अशी की, येलमटे यांची घरची परिस्थिती बेताची. उदरनिर्वाह करणेही अवघड असल्याने २० वर्षांपूर्वी बालाजी यांनी मित्रांसोबत धूम ठोकली ती पुण्याकडे. पुण्यात काही दिवस काम करूनही मिळणाऱ्या पगारामध्ये उदरनिर्वाह करताना त्यांना ती तारेवरची कसरत वाटू लागली. त्यामुळे त्यांनी पुण्यातूनही स्थलांतर केले. मात्र, तेथून गायब झालेले बालाजी पुन्हा ना घरच्याच्या संपर्कात ना मित्रांच्या संपर्कात राहिले नाहीत. त्यानंतर ते थेट २० वर्षानंतरचल अवतरले आहेत.
दरम्यानच्या कालावधीमध्ये नेमके काय झाले याची कहाणीही आश्चर्यचकित करणारी आहे. पुण्याहून बालाजी हे थेट नाशिक गेले होते. त्या दरम्यान नाशिक येथे कुंभमेळा सुरू होता. कुंभ मेळ्यात नागासाधू लोकांच्या संपर्कात राहून ते शेवटी त्यांच्या कळपात रमले आणि ते ही एक नागा साधू झाले. तेव्हापासून त्याचे जग हे देव, धर्म आणि देशापुरते सीमित राहिले असल्याचे ते सांगतात.
या साधुसेवेत असताना एक वेळ जन्मभूमीत जाण्याची मुभा असल्याने तब्बल २० वर्षानंतर बालाजी हे इतर दहा नागासाधू समवेत त्याच्या मूळगावी हाणमंतवाडी देवर्जन येथे आले आहेत. गावापासून जवळच असलेल्या निसर्ग सान्निध्यातील हत्ती बेटावर येऊन त्यांनी वास्तव्य केले आहे. एवढेच नाही तर आई - वडील, सगे सोयरे यांना ते नावानीशी ओळखतात.
दरम्यान, गावचा बालाजी परतल्याने हत्ती बेटावर त्याला पाहण्यासाठी ग्रामस्थांच्या रांगा लागत आहेत. २० वर्षानंतर बालाजी परतेल अशी अपेक्षा गावकऱ्यांनाच नाही तर त्याच्या आई-वडिलांनाही नव्हती. काळाच्या ओघात बालाजीच्या भाषेत बदल झाला आहे. तो मराठी बोलत नाही तर हिंदीवर त्याचे प्रभूत्व निर्माण झाले आहे. देश धर्म आणि साधू या पलिकडे आमचे जग नाही, असे त्याचे सोबती सांगत आहेत. त्यामुळे काही दिवस मायभूमीत राहिल्यानंतर पुन्हा बालाजी हा परतणार आहे.
तो जिवंत आहे हे आमच्यासाठी सर्वकाही -
माझा मुलगा कामाच्या शोधात गाव सोडून गेला होता. त्याचा २० वर्ष पत्ता नव्हता त्यामुळे तो जिवंत आहे का नाही, हे देखील आम्हाला माहिती नव्हते. परंतु माझा मुलगा साधूच्या रुपात परतला आहे. तो काही दिवसासाठी येथे आला आहे. मात्र, तो जिवंत असल्याचा आम्हाला आनंद असल्याचे त्यांची आई रशाबाई येलमटे म्हणाल्या.