लातूर - कडकडीत लॉकडाऊनमध्ये का होईना दहावीच्या परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक आणि अभिनंदानाचा वर्षाव होत आहे. तर, कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, ९३.२० टक्के गुण मिळूनही आनंदोत्सव साजरा करावा कसा, असा प्रश्न जळकोट तालुक्यातील होकर्णा गावच्या रेणुकासमोर आहे. मुलीच्या यशाबद्दल खात्री असणाऱ्या रेणुकाच्या आईचे निधन निकालाच्या पूर्वसंध्येलाच झाले. तर, ९ वर्षापूर्वीच वडिलांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. आज रेणुका यशाच्या शिखरावर आहे. पण हा आनंद साजरा करावा तरी कसा, असा प्रश्न आहे...
जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रम करायची तयारी असली की, यश मिळतेच. त्याप्रमाणेच रेणुका दिलीप गुंडरे हिचा आतापर्यंतचा प्रवास आहे. इयत्ता पहिलीत असतानाच वडील दिलीप गुंडरे यांचे हृदयविकाराच्या झटकाने निधन झाले होते. असे असतानाही परिस्थितीचा सामना करीत तिच्या आईने रेणुकाला शिक्षणाचे धडे देण्यास कुुठेही कमी केले नाही. आईच्या कष्टांना रेणुकानेही परिस्थितीची जाणीव ठेवत साथ दिली. घरकामात मदत, वेळप्रसंगी रोजदारीने काम केले. एवढे करून गावापासून काही अंतरावर असलेल्या वांजरवाडा येथे पायी जाऊन माध्यमिक शिक्षण घेतले. रेणुकाच्या हुशारीचा आणि जिद्दीचा सर्वांनाच हेवा होता. वडिलाचा हात डोक्यावर नसला तरी आईच्या परिश्रमाचे मुलगी चीज करणार, अशीच आशा शिक्षकांना आणि सर्वांनाच होती. मात्र, नियतीची मनात काही वेगळेच होती.
मंगळवारी नेहमीप्रमाणे रेणुकाची आई शेतामध्ये काम करीत होती. तेव्हा विषारी सापाने रेणुकाच्या आईला चावा घेतला आणि निकालाच्या पूर्वसंध्येलाच त्यांचा मृत्यू झाला. एका क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. आज निकाल लागला तेव्हा रेणुकाला ९३.२० टक्के गुण मिळाले आहेत. शिक्षक, मित्र परिवार आणि नातेवाईकांकडून कौतुक होत आहे. पण आई-वडिलांची कौतुकाची थाप वेगळीच असते. यालाच रेणुुका मुकली आहे. दु:खाला कवटाळून आता रेणुुकाला दोन लहान बहिणींनाच धीर देण्याची नामुष्की ओढवली आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेण्याचे रेणुकाचे ध्येय आहे. मात्र, प्रतिकूल परिस्थितीमुळे भविष्याची वाट खडतर दिसत आहे. त्यामुळे या कठीण प्रसंगी गरज आहे ती मदतीची. आज पैशांच्या जोरावर कमी गुण घेतलेले विद्यार्थी नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळवतात. पण मुळत: हुशार असलेल्या रेणुकाचे हालाखीच्या परिस्थितीमुळे काय होणार हा प्रश्न आहे. आता त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्तींनी समोर येऊन मदतीचा हात द्यावा, हीच अपेक्षा सर्वांकडून व्यक्त होत आहे.