लातूर- निसर्गाच्या लहरीपणाचा फटका पुन्हा एकदा मराठवाड्याला बसत आहे. निम्मा पावसाळा उलटला तरी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम असून खरिपातील पेरण्याही रखडलेल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा कृत्रिम पाऊस पडण्याच्या हालचाली सुरू असून जुलै अखेरीस हा प्रयोग केला जाणार आहे.
पोषक वातावरण निर्माण झाल्यास या पावसाचा फायदा धरणक्षेत्राला तसेच शेतकऱ्यांना होईल, असे बोलले जात आहे. मात्र पर्जन्यछायेच्या प्रदेशात येणाऱ्या मराठवाड्याला काळानुरूप हवामान बदलाशी जुळवून घ्यावेच लागेल. शिवाय पर्यावरणासंदर्भात असलेले आर्थिक दारिद्र्यदेखील झटकावे लागणार असल्याचे मत, पर्यावरण तज्ञ तथा महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य अतुल देऊळगावकर यांनी व्यक्त केले.
मराठवाड्यात अद्यापही पाऊस सक्रिय झाला नसल्याने केवळ 10 टक्के पेरण्या झाल्या आहेत. त्यामुळे मराठवाड्यावर चिंतेचे ढग कायम आहेत. दिवसेंदिवस कमी होत असलेला पाऊस हा हवामान बदलाचा एक भाग आहे. त्यामुळे राज्य आणि केंद्र स्थरावर प्रयत्न करणे गरजेचे आहेच, शिवाय स्थानिक पातळीवरही हवामानाला अनुकूल अशी पीकपद्धती घ्यावी लागणार आहे. काळाच्या ओघात वनक्षेत्रावर झालेले अतिक्रमण, बेकायदेशीर बांधकामे यामुळे ही स्थिती ओढवली असल्याचे मत देऊळगावकर यांनी व्यक्त केले.
कृत्रिम पावसाची प्रक्रिया ही जून महिन्याच्या सुरुवातीलाच राबविणे गरजेचे होते. याला उशीर झाला असला तरी जुलै महिन्याच्या अखेरीस कृत्रिम पावसाचा प्रयोग केला जाणार आहे. धरण क्षेत्राबरोबरच शेतीलाही याचा फायदा होण्याची आशा आहे. संगणकाद्वारे ढगातील पाण्याचा अभ्यास करून विमानाद्वारे हा प्रयोग केला जाणार आहे. सलग 5 वर्ष हा प्रयोग राबविल्यानंतरच याचे यश-अपयश ठरिवले जाते. यापूर्वीही असे प्रयोग करण्यात आले आहेत. मात्र, त्यांना वेळोवेळी अपयश आले आहे. त्यामुळे यावेळेसच्या प्रयोगामुळे मराठवाड्यातील लोकांना दिलासा मिळतो का हे पाहावे लागेल.
हवामान बदलाप्रमाणे हा प्रयोग करणे आवश्यक बनले आहे. मात्र, तसे होत नाही हे दुर्दैव असल्याची खंतही यावेळी देऊळगावकर यांनी व्यक्त केली.