लातूर - शेतकऱ्यांवरील संकटाची मालिका रब्बी हंगामातही कायम राहिली आहे. उशिराच्या पावसामुळे पेरणी लांबणीवर पडली होती. तर आता अंतिम टप्प्यात असताना अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ज्वारीसह गहू, हरभरा, टरबूज, खरबूज काढणीला आले असतानाच पावसाने ही अवकृपा दाखवली आहे.
लातूर तालुक्यासह लगतच्या रेणापूर तालुक्यात बुधवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर रेणापूर तालुक्यातील बरदापूर, पानगाव या ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. ज्वारी, गहू, हरभरा या पिकांची काढणी अंतिम टप्प्यात असतानाच पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे न भरून निघणारे नुकसान झाले आहे.
यापूर्वी खरीप हंगामातील पिकांचेही असेच नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांवरील संकटाची मालिका कायम आहे. दीड तास झालेल्या पावसात लाखोंचे नुकसान झाले आहे. नुकसाभरपाई देण्याची मागणी लातूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.
ज्वारी, गहू ही पिके जमिनीवर आडवी झाली आहेत. तर टरबूज, खरबूज जागेवर सडून गेली आहेत. हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा आहे.
हेही वाचा - कोरोना इफेक्ट : रो-रो सेवेच्या फेऱ्या बंद; 'मुहूर्त' चुकल्याची' नागरिकांमध्ये चर्चा !
हेही वाचा - एसटी प्रवासात ज्येष्ठांसाठीच्या स्मार्ट-कार्ड सवलतीला एक महिना मुदतवाढ