लातूर - जिल्ह्यात वेळ अमावस्या सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असलेल्या जिल्ह्यांमध्ये हा सण मोठ्या प्रमाणात साजरा होतो. गेल्या दोन दिवसांपासून नागरिक या अमावस्येची तयारी करत आहेत. शहरातील बाजारपेठेतही सणाचे वातावरण आहे.
मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटी रब्बी पिके बहरत असताना ही वेळ अमावस्या साजरी केली जाते. अमावस्याच्या पूर्वसंध्येला भज्जीच्या भाजीची तयारी केली जाते. या सणानिमित्त शेतामध्ये विधीवत पूजा करून भोजनाचा आस्वाद घेतला जातो. वनभोजनाबरोबर काळ्या आईची म्हणजेच शेतीची पूजा केल्यानंतर या सणाला सुरूवात होते. शेतकऱ्यांकडून वन भोजनाची तयारी केली जाते. शहरातील अनेक नागरिकही शेतकरी मित्रांकडे या सणासाठी जातात. मग फड रंगतो तो गप्पांचा आणि सुख-दुःखाचा. या सणामुळे आज लातूर शहरात कमालीचा शुकशुकाट तर शेतावर किलबिलाट पाहवयास मिळाला.
असे होते पूजन -
पूजेसाठी कडब्याची कोप करून पांडवांची पूजा केली जाते. या सणासाठी बाजरी, ज्वारीचे ऊंडे, अंबील आणि भज्जीची भाजी हा मेनू असतो. तर सायंकाळी ज्वारीच्या पेंढीचा टेंभा करून तो शेतामधील पिकांमध्ये पेटवून गावात आणून मंदिरासमोर ओवाळायचा अशी प्रथा आहे. आजही ही प्रथा मोठ्या परंपरने पार पाडली जात आहे.
हेही वाचा - लातुरात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात मोर्चा; बाजारपेठ, बससेवा बंद