लातूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा कशा प्रकारे सुरू आहे याची जिल्हा परिषद अध्यक्षांनी पाहणी केली. या पाहणीत त्यांच्या कर्मचाऱ्यांचे पितळ उघडे पडले. किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात घाणीचे साम्राज्य, कर्मचाऱ्यांची गैरहजेरी हे नित्याचे आहे. मात्र, झेडपी अध्यक्षांना आरोग्य केंद्रात दारूच्या बाटल्या सापडल्या. हा प्रकार समोर येताच झेडपी अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचे संकेत दिले आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे या ठिकाणची यंत्रणाही सक्षम असणे आवश्यक आहे. त्याच दृष्टीने झेडपी अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी अहमदपूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना अचानक भेटी दिल्या. या पाहणीदरम्यान त्यांना किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात घाणीचे साम्राज्य आणि दारूच्या बाटल्या आढळल्या. त्यामुळे येथील तीन कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्याची त्यांनी शिफारस केली आहे.
केंद्रे यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कक्षापासून ते औषध भांडार, जनरल वॉर्ड यांची देखील पाहणी केली. हजेरीपटवर कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱया असून प्रत्यक्षात कर्मचारी हजर नसल्याचेही त्यांच्या लक्षात आले. जनरल वॉर्डमधील कोपऱ्यात दारूच्या बाटल्या आणि सिगारेट आढळले. अशी अवस्थेत असणाऱ्या केंद्रांमध्ये कशा पद्धतीने उपचार केले जात आहेत, अशी विचारणाही केंद्रे यांनी कर्मचाऱ्यांना केली. त्यावेळी अधिकारी निशब्द झाले तर कर्मचारी हे कामाचे कारण सांगून वेळकाढूपणा करत होते. किनगावातील तीन आरोग्य सेवकांवर कारवाईकरून त्यांची वार्षिक वेतनवाढ बंद करण्याची शिफारस केंद्रे यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी गोयल यांच्याकडे केली आहे.
या पाहणी दौऱ्यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षांसोबत समाजकल्याण सभापती रोहिदास वाघमारे, जिल्हा परिषद सदस्य अशोक केंद्रे, बालाजी गुट्टे उपस्थित होते.