लातूर - संचारबंदी असल्यामुळे अत्यावश्यक सेवा देण्याची परवानगी प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील रुग्णालये, मेडिकल, किराणा दुकान आणि भाजी मंडई सुरू आहे. मात्र, या ठिकाणीही नागरिकांची वर्दळ होऊ लागल्याने 'सुरक्षित अंतर' ठेऊन नागरिकांच्या रांगा लागल्याचे चित्र शहरातील किराणा दुकान आणि भाजी मंडईत पाहावयास मिळत आहे.
गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात संचारबंदी लागू झालेली आहे. या दरम्यान शहरातील मुख्य रस्त्यावर शुकशुकाट पाहवयास मिळत असून, सकाळच्या प्रहरी भाजी आणि किराणा माल खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ३ फुटाचे अंतर सोडून नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत. सध्या महिनाअखेर सुरू असून, महिन्यासाठी भरलेला किराणा संपत आहे. शिवाय भविष्यात मुबलक प्रमाणात किराणा मिळेल की नाही या धास्तीने नागरिक घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे किराणा दुकानासमोर रांगा लागल्याचे चित्र गुरुवारी सकाळी पाहावयास मिळाले.
खबरदारी म्हणून किराणा दुकानासमोर दुकान मालकांनी तर भाजी मंडईत मनपाच्यावतीने दोन नागरिकांमध्ये सुरक्षित अंतर राहावे, यादृष्टीने उभे राहण्याची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकही रांगेत आणि सुरक्षित अंतरावरूनच माल खरेदी करीत आहेत. दवाखाने, मेडिकल, भाजी मंडई आणि किराणा दुकाने वगळता शहरात शुकशुकाट पाहवयास मिळत आहे. शिवाय चौकाचौकात बॅरिकेड्स आणि पोलीस बंदोबस्त तैनात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकही कोरोनाग्रस्त रुग्ण आढळलेला नाही. खबरदारी म्हणून ही उपाययोजना राबवली जात आहेत. लातूरकरही या सूचनांचे पालन करीत आहेत.
ग्रामीण भागात परजिल्ह्यातून येणाऱ्यांची तपासणी तर शहरात आशा प्रकारची खबरदारी पाळली जात असल्याने कोरोनाबद्दल लातूर प्रशासन सतर्क असल्याचे पाहायला मिळत आहे.