लातूर - पीक पद्धतीमध्ये बदल केल्यास चार पैसे पदरात पडतील, या आशेपोटी निलंगा तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी टरबुजाची लागवड केली. मात्र, आता पिकांच्या काढणीच्या प्रसंगी लॉकडाऊन करण्यात आले असल्याने सर्वकाही ठप्प झाले आहे. कोरोना विषाणूच्या या संकटामुळे निलंग्यातील बापूराव बिराजदार आणि संभाजी बिराजदार या टरबुज उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वाहतूक व्यवस्था कोलमडल्याने या शेतकऱ्यांच्या शेतात तयार असलेले लाखोंचे टरबुज शेतातच सडत आहे.
हेही वाचा... देशात गेल्या २४ तासांमध्ये तब्बल ७०४ नवे रुग्ण; २८ नवे बळी..
निलंगा तालुक्यातील तरूण शेतकरी बापूराव बिराजदार आणि संभाजी बिराजदार (रा. हाणमंतवाडी) या दोन्ही भावांनी आपल्या तीन एकर शेतीत दोन ते अडीच लाख रुपये खर्च करून टरबुजाचे उत्पादन घेतले. औषध फवारणी, पाण्याचे नियोजन करून तळहाताच्या फोडाप्रमाणे पिकाची जोपासना केली. मात्र, ऐन पिक काढणीच्या प्रसंगी कोरोना विषाणूचे वादळ आले आणि देशात लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे स्रव काही ठिक असूनही फक्त वाहतुकीची सोय नसल्याने आणि मालाची खरेदी करायला कोणी तयार नसल्याने लाखो रुपयांचे टरबुज फळपिक शेतातच पडुन आहे.
याबाबत बोलताना या तरुण शेतकऱ्यांनी, 'व्यापारी शेताकडे फिरकत नाहीत. स्थानिक पातळीवर विक्री करणेही मुश्किल झाले आहे. तयार असलेले हे फळ कोणीही घेऊन जात नाही' असे या बिराजदार बंधूंनी सांगितले आहे. या दोन्ही तरूण शेतकऱ्यांना सध्या शासनाच्या मदतीची गरज आहे.