लातूर - दुष्काळी यादीत जिल्ह्याच्या समावेश होण्यापासून संभ्रम निर्माण झाला होता. दोन महिन्यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या तालुक्यांच्या यांदीत केवळ शिरुरअनंतपाळ या एकाच तालुक्याचा समावेश करण्यात आला होता. त्यांनतर इतर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागणीमुळे जिल्ह्यातील ८ मंडळे वगळता सर्व तालुक्यांचा समावेश दुष्काळ यादीमध्ये करण्यात आला.
सपूर्ण मराठवाड्याला दुष्काळाच्या तीव्र झळा जाणवू लागल्या आहेत. पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर होत आहे. रब्बी आणि खरीप उत्पादनात मोठी घट झाल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे, असे असताना पहिल्या यादीत जिल्ह्यातील १० तालुक्यांपैकी केवळ शिरुरअनंतपाळ या एकाच तालुक्याचा समावेश करण्यात आला होता. यानुसार १६ कोटीच्या अनुदानाची घोषणाही झाली असून मदतीचे काम जिल्हा प्रशासनाने २५ जानेवारीपासून हाती घेतले आहे. मात्र, जळकोट, लातूर ग्रामीण या भागात दुष्काळाच्या झळा अधिक तीव्रतेने जाणवत असतानाही येथील शेतकरी मदतीपासून वंचित आहेत.
आतापर्यंत ३ कोटी रुपयांचे वाटप झाले असून आठवड्याभरात उर्वरीत निधीचे वाटप केले जाणार आहे. इतर तालुक्यांसाठीच्या निधीची पूर्तता राज्य सरकारकडून होताच त्याचेही वाटप केले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी ईटीव्ही भारत शी बोलताना सांगितले.