लातूर - शुक्रवारी जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. दिवसभरात ४१४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर लातूर तालुक्यातील मुरुड येथे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने शनिवारपासून ५ दिवसाचा 'जनता कर्फ्यु' राहणार आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून लातूरकरांच्या चिंतेत भर पडत आहे.
जिल्ह्यात आरटीपीसीआर आणि अँटीजन टेस्ट वाढवण्यात आल्या आहेत. त्याचा परिणाम शुक्रवारी पाहवयास मिळाला. शुक्रवारी एकाच दिवसात तब्बल ४१४ रुग्ण वाढले आहेत. ३२२ आरटीपीसीआर टेस्ट तर ११२२ अँटीजन टेस्ट करण्यात आल्या होत्या. यांपैकी १०५ आरटीपीसीआर तर ३०५ हे अँटीजन रॅपिड रेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळले आहेत. आतापर्यंतची सर्वाधिक वाढ ही शुक्रवारी झाली आहे. जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ही ९११५ झाली आहे. यांपैकी ६९६९ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत. १९२० रुग्ण हे रुग्णालयात तर ३२१ रुग्ण हे घरीच उपचार घेत आहेत. अनलॉकडाउन सुरू झाल्यापासूनची ही सर्वाधिक वाढ झाली आहे. शहरासह आता ग्रामीण भागात रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३०५ जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. शुक्रवारी जिल्ह्यात ९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. वाढती कोरोना रुग्णांची संख्या ही जिल्हा प्रशासनाच्या चिंतेत भर टाकणारी आहे.
मुरुडमध्ये ५ दिवसाचा 'जनता कर्फ्यु' लागू करण्यात आला आहे. मुरुड गावात एकूण रुग्णांची संख्या ही शंभरपेक्षा अधिक झाली आहे. त्यामुळे ही साखळी तोडण्याच्या दृष्टीने मुरुड शहर हे ५ दिवसासाठी बंद राहणार आहे. दोन महिन्यांपूर्वी या गावात एकही कोरोना रुग्ण नव्हता. मात्र, लॉकडाऊन हटवल्यानंतर सर्वकाही सुरळीत सुरू करण्यात आले असून यामधूनच रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना रुग्णांची साखळी तोडण्यासाठी मुरुड ग्रामपंचायतीने हा निर्णय घेतला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बाजारपेठ ही बंद राहणार आहे. लातूर, औसा आणि निलंगा तालुक्यातच कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत होती. परंतू आता ग्रामीण भागातही रुग्णांची संख्या वाढत आहेत. त्यामुळेच मुरुड बाजार पेठ बंद ठेवण्यात येणार आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत २२४१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.