लातूर - पावसाच्या लहरीपणाचा फटका पुन्हा एकदा मराठवाड्याला बसत आहे. लातूर विभागातील एकाही जिल्ह्यात सरासरीपेक्षा ४० टक्के क्षेत्रावर पेरणी झालेली नाही. शिवाय पेरणी झालेल्या जमीन क्षेत्रावरील पिके पाण्याअभावी उगवतील की नाही, अशी स्थिती असल्याने विभागातील पाचही जिल्ह्यातील खरीप हंगाम धोक्यात आला आहे.
मराठवाड्यात यंदा सुरुवातीपासूनच पावसाने पाठ फिरवलेली आहे. त्यामुळे पेरणी योग्य पाऊस झाल्यावरच चाढ्यावर मूठ धरण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला होता. जुलै महिना निम्म्यावर आला तरी एकाही जिल्ह्याने १०० टक्क्यापेक्षा अधिक सरासरी गाठलेली नाही. लातूर विभागात लातूर, उस्मानाबाद, हिंगोली, परभणी या जिल्ह्यांचा समावेश आहे. सर्वाधिक पेरा हिंगोली येथे १ लाख ४१ हजार ५१३ म्हणजे सरासरीच्या ३५ टक्के पेरा झाला आहे तर सर्वात कमी लातूर जिल्ह्यात १ लाख ५ हजार १०३ हेक्टरावर म्हणजे सरासरीच्या केवळ १६ टक्के परणी झाली आहे.
पावसाने उघडीप दिल्याने विभागातील सर्व ठिकाणच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. तर दुसरीकडे पेरणी केलेल्या क्षेत्रावरील पिकांवरही धोक्याची घंटा आहे. उगवण झालेल्या पिकांची पाण्याअभावी वाढ खुंटली असून शेतकऱ्यांकडे उपलब्ध पाणीसाठाही नाही. खरीप हंगामातील पिकांचा कालावधी हा ३ महिन्याचा असताना सद्यस्थितीला दीड महिन्याचा विलंब झाला आहे. त्यामुळे आता पेरणी झाली तरी त्याचा उत्पादनावर परिणाम होणार असल्याने विभागातील ९१ लाख २३ हजार ७२८ हेक्टरावर पेरणी होणार की नाही याबाबत साशंका उपस्थित होत आहे.
मागील ३ वर्षापासून मराठवाड्यातील बळीराजा दुष्काळाने होरपळत आहे. असे असतानाच भर पावसाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यंदाही खरीप पदरी पडतो की नाही याबाबत शेतकरी चिंतातूर आहे. लातूर विभागात आतापर्यंत सरासरीच्या ५० टक्केही पाऊस झाला नसल्याने ही स्थिती ओढावली आहे.