लातूर - जम्मू-काश्मीरच्या सीमेवर कर्तव्य बजावत असताना औसा तालुक्यातील जवान सुरेश गोरख चित्ते यांना वीरमरण आले. ग्लेसर येथे ऊंचावर ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. 14 वर्षे कर्तव्य बजावल्यानंतर ते दीड वर्षाने निवृत्त होणार होते. मात्र, यापुर्वीच त्यांना विरमरण आले. त्यामुळे मकर संक्रातीच्या सणादिवशीच गावात शोककळा पसरली आहे.
हेही वाचा - इराण अण्विक कराराची जागा आता 'ट्रम्प डील' घेणार?
सियाचीन भागातील बटालियनमध्ये सुरेश चित्ते हे शिपाई पदावर रुजू होते. बर्फाळ प्रदेशावरील ऊंचावर त्यांना पुरेसा ऑक्सिजन मिळाला नसल्याची माहिती समोर येत आहे. दोन महिन्यापुर्वीच ते गावाकडे आले होते. त्यांच्या मनमिळावू स्वभाव आणि हसतमुख चेहऱ्यामुळे ते पंचक्रोशीत लोकप्रिय होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा आणि दोन मुली आहेत. सुट्टी दरम्यान, गावाकडे आल्यावर मुलींना घेऊन दुचाकीवर असतानाचा त्यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यांना श्रंद्धांजली दिली जात आहे. संक्रातीनिमित्त गावात यात्रा आणि मंदिरात आज कीर्तनाचा कार्यक्रम असतो. मात्र, ही घटना समोर येताच सर्व धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात अल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. गुरूवारपर्यंत (16 जानेवारी) सुरेश यांचा मृतदेह गावात येईल असेही सांगण्यात आले आहे.