लातूर - कोरनाच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे सर्व काही ठप्प होते. मात्र, आता अनलॉक 1 सुरू झाला असून या कालावधीत जिल्ह्यातील उद्योगांना उभारी देण्याच्या अनुषंगाने सरकार स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत. शिवाय लवकरच विमानसेवा कार्यान्वित केली जाणार असल्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी आढावा बैठकीत स्पष्ट केले आहे.
लॉकडाऊनमुळे शिथिलता निर्माण झाली असतानाही उद्योगांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्याअनुषंगाने आज पालकमंत्री अमित देशमुख यांनी आढावा बैठक घेतली. लॉकडाऊनच्या काळात अनेक कामगार हे निघून गेलेले आहेत. त्यामुळे उद्योजकांनी एमआयडीसीकडे कुशल-अकुशल कामगारांची मागणी नोंदवावी. स्थानिक मजुरांच्या हाताला काम मिळेल या दृष्टिकोनातून प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे अमित देशमुख यांनी सांगितले.
एमआयडीसीमधील पाणीप्रश्न, कामगारांचा प्रश्न, वीज बिलात सवलत, मार्केट टॅक्स कमी करणे यासारख्या मागण्या उद्योजकांनी केल्या. याबाबत शासन स्तरावर प्रयत्न केले जातील, असे आश्वासन अमित देशमुख यांनी दिले. लॉकडाऊनमुळे चीनमधील उद्योग स्थलांतरित होण्याची शक्यता आहे. या उद्योगातील कमी पाण्यावर चालत असलेले उद्योग हे लातूर, उस्मानाबाद या भागात यावेत, याकरिता मंत्रालयाकडे पाठपुरावा केला जाणार असल्याचेही अमित देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून लातूर येथील विमानसेवा कार्यान्वित नाही. अर्धवट राहिलेल्या कामांना चालना देऊन ती कामे पूर्ण केली जाणार आहेत. शिवाय केंद्राच्या उड्डाण योजनेंतर्गत लातूरचे विमानतळ सुरू केले जाणार असल्याचेही देशमुख यांनी सांगितले.
एकंदरीत अनलॉक 1 सुरू झाल्यानंतर उद्योग व्यवसायांना उभारी देण्याच्या अनुषंगाने ही आढावा बैठक पार पडली आहे.