लातूर - एकीकडे परतीच्या पावसाने खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे लातूर शहरवासीयांचा पाणीप्रश्न मिटला आहे. मात्र, आगामी काळात जलसंवर्धनावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक असल्याचे आमदार धीरज देशमुख यांनी सांगितले. पिक पाहणीनंतर धीरज देशमुख यांनी मांजरा धरणावर जाऊन पाहणी केली.
हेही वाचा- खडसेंना डावलल्यामुळे भाजपवर हास्यास्पद वेळ - अनिल गोटे
भर पावसाळ्यात लातूर जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरवली होती. त्यामुळे शेतीसाठी तर दूरच परंतु, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील उपस्थित झाला होता. मांजरा धरणात केवळ 4.5 दलघमी पाणीसाठा शिल्लक राहिल्याने महिन्यातून दोनदा पाणीपुरवठा करण्याची नामुष्की मनपा प्रशासनावर आली होती. मात्र, गेल्या 15 दिवसांपासून मांजरा धरणातील कळंब, केज या तालुक्यात पावसाने हजेरी लावल्याने 4 दलघमी वरून पाणीसाठा थेट 43 दलघमीवर गेला आहे. त्यामुळे लातूरकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. अद्यापही धरण मृतसाठ्यात असले तरी जूनपर्यंत पाणी पुरेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याच अनुषंगाने आमदार धीरज देशमुख यांनी धरणातील पाण्याची पाहणी केली. शिवाय अधिकाऱ्यांकडून आढावाही घेतला. परतीची कृपादृष्टी राहिली म्हणून पाणीप्रश्न मिटला आहे. असे असले तरी पाण्याचे योग्य नियोजन आणि जलसंवर्धन यासारखे उपक्रम राबविणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.