लातूर - जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दिवसाला 700 रुग्ण वाढत असल्याने कोविड सेंटरची संख्याही वाढविण्यात आली आहे. तर ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये यासाठी योग्य ते नियोजन केले जात आहे. मात्र, मागणी 1 हजार सिलिंडरची आहे आणि पुरवठा 700 सिलिंडरचा होत आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढत राहिली तर ऑक्सिजनसाठी योग्य ते नियोजन करावे लागणार आहे.
हेही वाचा - उद्रेक.. राज्यात शनिवारी कोरोना रुग्णांची संख्या ५० हजाराच्या उंबरठ्यावर, २७७ जणांचा मृत्यू
5 हजार 573 रुग्णांवर उपचार सुरू
लातूर जिल्ह्यात 5 हजार 573 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अनेकांवर घरच्या घरी उपचार सुरू असून आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचारी यावर लक्ष ठेऊन आहेत. शिवाय परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढल्याने शहरातील पाच नंबर चौक, बसस्थानक या ठिकाणी तपासणीही केली जात आहे. शनिवारी 692 रुग्ण आढळून आले होते. वाढत्या रुग्णसंख्येमुळे शहरातील पान टपऱ्या, हॉटेल्स, रेस्टॉरंट बंद ठेवण्यात आले आहेत.
हेही वाचा - मंत्री यशोमती ठाकूर यांनी घेतली दिपाली चव्हाण यांच्या कुटुंबियांची भेट
अन्यथा कडक निर्बंध : जिल्हाधिकारी
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शहरासह ग्रामीण भागात रुग्ण वाढत असल्याने आठवडी बाजार देखील बंद करण्यात आले आहेत. असे असतानाही रुग्ण संख्या वाढत राहिली तर कडक निर्बंध लादले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले.