लातूर - कचऱ्याचे व्यवस्थापन आणि शहरात जागोजागी होत असलेले संकलन यावरून मनपाचे सत्ताधारी-विरोधक सातत्याने आमने-सामने आले आहेत. २०१९साली स्वछता मोहिमेत लातूर शहराला राज्य सरकारचा पुरस्कारही मिळाला होता. परंतु, गेल्या वर्षभरापासून कचऱ्यामुळे शहराचे विद्रुपीकरण झाले आहे. या पार्श्वभूमीवर शहराच्या मध्यवर्ती भागात कचरा टाकण्यास विरोध करीत काल भाजप युवा मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
शहराच्या दुरवस्थेला सत्ताधारीच जबाबदार असल्याचा आरोप नगरसेवक तथा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी केला. २०१८मध्ये स्वच्छ भारत अभियानात लातूर मनपाने देशात ३७वा क्रमांक पटकावला होता. त्याला केंद्राच्या वतीने पुरस्कारही देण्यात आला होता. पण, गेल्या वर्षभरापासून स्वच्छतेकडे मनपाचे दुर्लक्ष होत आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर घाणीचे साम्राज्य साचले आहे. नियमित कचऱ्याचे संकलन करून विल्हेवाट लावली जात नसल्याचा आरोप नगरसेवक अजित पाटील कव्हेकर यांनी केला.
३७ व्या क्रमांकावर असलेले लातूर आता १३७ व्या क्रमांकावर
शहरालगतच्या नांदेड रोड, महात्मा बसवेश्वर चौक, तसेच कचरा व्यवस्थापनाच्या ठिकाणीच ढिगारे लावण्यात आले आहे. त्यामुळे, ३७व्या क्रमांकावर असलेले लातूर आता १३७व्या क्रमांकावर गेले आहे. मनपामध्ये काँग्रेसची सत्ता आहे, शिवाय काँग्रेस पक्षाच्याचेच पालकमंत्री आसताना ही दुरवस्था असल्याचा आरोप अजित पाटील कव्हेकर यांनी केला.
शिवाय शहरात कचरा संकलनाला विरोध करीत ज्या ठिकाणी कचऱ्याचे संकलन केले जात आहे त्या ठिकाणाहून आंदोलन करण्यात आले आहे. स्वच्छ शहर, सुंदर शहर हे आता केवळ नावालाच राहिले आहे. त्यामुळे, संकलनापासून ते विल्हेवाट लावण्यापर्यंत मनपाने योग्य ती पावले उचलणे गरजेचे आहे.
कचऱ्यापासून खत निर्मितीचा विसर
शहरातील कचऱ्याचे एका ठिकणी संकलन करून त्यावर प्रक्रिया करून खत निर्मिती करण्याचा निर्धार मनपाने केला होता. याकरिता जागाही उपलब्ध करून आवश्यक ती यंत्र सामुग्रीही आणण्यात आली होती. परंतु, काळाच्या ओघात येथील प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना विसर पडल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे.
हेही वाचा- धुळे : दोंडाईचा येथे शिवसेनेकडून नारायण राणेंच्या पुतळ्याचे दहन