लातूर - जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. निलंगा तालुक्यातील औराद शाहजनी येथे सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या पावसामुळे अनेक घरात आणि दुकानात पाणी घुसले आहे. त्यामुळे व्यावसायिक आणि नागरिकांची तारांबळ उडाली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत पावसाने पाठ फिरवली होती. परंतु, या आठड्याच्या सुरुवातीपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. निलंगा तालुक्यातील औराद शाहजनी, तागरखेडा, हलगरा या गावांच्या शिवारात पावसाने कहर केला असून त्यामुळे खरिपातील सोयाबीनचे नुकसान झाले आहे. शिवाय गावभागात पाणी घुसल्याने नागरिकांचीही तारांबळ उडाली आहे. दरवर्षी अवर्षणाच्या गडद छायेत असलेल्या या भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मात्र, हा नुकसानीचा पाऊस असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत.
बुधवार पाठोपाठ आज गुरुवारीही पावसाने हजेरी लावली. यातच औराद शाहजनी ते तागरखेडा या गावादरम्यानचा ओढा दुथडी भरून वाहत असल्याने दोन्ही गावचा संपर्क तुटला आहे. आतापर्यंत मराठवड्यात सर्वात कमी पाऊस हा लातूर जिल्ह्यात झाला होता. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तर, काही भागात मुसळधार पाऊस होत असल्याने खरीपाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा - पालकमंत्री देशमुखांच्या बाभळगावातील गढीसमोर मराठा क्रांती मोर्चाचा घंटानाद