लातूर - कोरोना रोगाच्या महामारीने संपूर्ण जनता परेशान झाली आहे. त्यातच सततच्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या शेतातील भाजीपाला, फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आज दुपारी ४ वाजता निलंगा तालुक्यात अवकाळी पावसाने हजरी लावली. विजांचा कडकडाट व वादळ वाऱ्यामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेली आहेत. अनेक गाव व शेतातील झाडे उन्मळून पडली असून कलांडी येथे वीज पडून २ बैलांचा मृत्यू झाला आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांनी गुराढोरांसाठी रानात चारा व कडब्याची बणीम ठेवली होती, ते सर्व वादळवाऱ्याने उडून गेले. तसेच, शेतातील गोठ्यावरील पत्रे उडाल्याने अनेक जनावरे जखमी झाली आहेत. अंबुलगा (बु), निटूर, बसपूर, शिरोळ, वांजरवाडा, शिऊर काटेजवळगा, केदारपूर, सावनगीरा, आंबेवाडी, आनंदवाडीसह अनेक गावात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. अवकाळी पावसात वीज पडून तालुक्यातील कलांडी येथील अंगद वाघे या शेतकऱ्याचे दोन बैल जागीच ठार झाले आहेत. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या फळबागांचे पंचनामे करून तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
हेही वाचा- काटगावात विवाहितेची आत्महत्या; सासरचे सात जण अटकेत