लातूर - अहमदनगरहून अहमदपुरकडे निघालेला अवैध गुटख्याचा टेम्पो पोलिसांनी पकडला आहे. अहमदपूर हद्दीत हा टेम्पो दाखल होताच किनगाव पोलिसांनी कारवाई केली. अन्न-औषध प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांनी पंचनामा केल्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
लातूर जिल्ह्यात अवैध धंदे आणि चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. रविवारी मध्यरात्री अहमदनगरकडून अहमदपुरकडे अवैध गुटख्याची वाहतूक सुरू होती. नाकाबंदी असलेल्या ठिकाणी पोलिसांनी टेम्पोची तपासणी केली. यामध्ये गुटख्याची 50 पोती आढळली. प्रत्येक पोत्याची किंमत 36 हजार रुपये आहे. असा पोलिसांनी एकूण 18 लाख रुपयांचा मुद्देमाल पकडला. पोलिसांनी टेम्पो चालक अशोक रामभाऊ शेंडगे हा बीडचा रहिवासी असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलीस अधीक्षकाच्या सूचनेनुसार जिल्ह्यात पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी सुरू केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक जीलानी मनूल्ला, व्यंकटेश महाके, मेहबूब सय्यद, गणेश कल्याने, वानदास कोळी यांनी ही कारवाई केली आहे.