लातूर - मराठवाडा पदवीधर निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रमुख पक्षांच्या उमेदवारांकडून वेगवेगळी आश्वासने देण्यात येत आहेत. या निवडणुकीत विविध पक्षांच्या उमेदवारांकडून जरी आश्वासनांची खैरात होत असली, तरी ही निवडणूक वैचारिकतेच्या मुद्द्यावर लढवणार असल्याचे गोंडराजे आत्राम यांनी स्पष्ट केले आहे. गोंडराजे आत्राम हे मराठवाडा पदवीधर मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढवत आहेत.
पदवीधर निवडणूक आठवड्यावर येऊन ठेपली आहे. सर्व उमेदवार आपल्या प्रचारामध्ये व्यस्त आहेत. 59 वर्षीय गोंडराजे आत्राम यांनी देखील मराठवाडा पदवीधर निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आत्राम हे वैचारिक मुद्दे घेऊन ही निवडणूक लढवणार आहेत, आणि याच मुद्यांवर यंदाच्या निवडणुकीचा निकाल लागणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
आत्राम हे साहित्यिक तसेच समाजसेवक आहेत. 12 वर्षांपासून नेतृत्व करत असलेले उमेदवार आजही पदवीधरांच्या समस्या घेऊन मतदारांसमोर जात आहेत. मग त्यांनी इतक्या वर्षांत का केले, असा सवालही आत्राम यांनी उपस्थित केला आहे. आजही प्रचाराचे मुद्दे जुनेच असतील तर हे दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दिवसेंदिवस निवडणुकीचे चित्र बदलत आहे. प्रमुख पक्षांच्या उमेदवरांकडे पैसा असला तरी वैचारिक दृष्टीकोन नाही. त्यामुळे आतापर्यंत प्रश्न मार्गी लागले नाहीत. याच मुद्यावर यंदाची निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.