लातूर - कोरोनाचा परिणाम प्रत्येक घटकांवर झाला आहे. कोरोनाची भीती आणि लॉकडाऊनमुळे ओढवलेल्या परिस्थितीमुळे अनेक रुग्ण वेळेवर उपचारही घेऊ शकलेले नाहीत. यामध्ये विशेषतः कान, नाक, घसा आणि नेत्ररोगासंबंधी रुग्णांचा समावेश आहे. नेत्रविकाराने त्रस्त रुग्ण या लॉकडाऊनमुळे वेळेवर उपचार घेऊ शकत नाहीत. परिणामी, मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया रखडल्या असून महिन्याकाठी चार ते पाच रुग्ण आढळू लागल्याची धक्कादायक माहिती 'ईटीव्ही भारत'ने घेतलेल्या आढाव्यात समोर आली आहे.
हेही वाचा - केईएम रुग्णालयात शनिवारपासून सिरम-ऑक्सफर्डच्या कोविशिल्ड लसीची चाचणी
आरोग्य विभागाशी निगडीत असलेली संपूर्ण यंत्रणा ही कोरोनाशी दोन हात करण्यात व्यस्त आहे. येथील वैद्यकीय महाविद्यालयात केवळ गंभीर तसेच अपघातग्रस्त रुग्णांच्या उपचाराला प्राधान्य दिले जात आहे. तर, रुग्णालयातील विविध विभागांचे रुपांतर हे कोविड सेंटर म्हणून करण्यात आले आहे. यामध्ये कान, नाक, घसा आणि डोळ्यांच्या दवाखान्यांचा समावेश आहे. परिणामी, खासगी रुग्णालयात रुग्णांची गर्दी वाढली होती. परंतु, जिल्ह्यात वाढती कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाहता लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते.
नेत्रनिदान करणाऱ्या जिल्ह्यातील मुख्य तीन डॉक्टरांनादेखील कोरोना झाला होता. त्यामुळे लातूरसह उदगीर येथील रुग्णालये ही दीड ते दोन महिने बंद होती. या तिन्ही डॉक्टरांना रुग्णांकडूनच कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे डॉक्टरांनी खबरदारी घेण्यावर भर दिला होता. दरम्यानच्या काळात अनेकांचे उपचार हे लांबणीवर पडले होते. मात्र, यामध्ये मोतीबिंदू यासारख्या शस्त्रक्रिया वेळेत होऊ न शकल्याने काचबिंदू आजाराने त्रस्त झालेल्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. नियमित उपचार होत असताना महिन्याकाठी एखादा रुग्ण आढळून येत होता. परंतु, वेळेत उपचार न झाल्याने महिन्याकाठी चार ते पाच रुग्ण समोर येऊ लागले आहेत.
हेही वाचा -सुशांतसिंह राजपूत प्रकरण : एनसीबीकडून हिमाचल प्रदेशमध्ये एकाला अटक
महिन्याभराच्या लॉकडाऊननंतर आता सर्वकाही पूर्ववत सुरू झाले आहे. पण अजूनही खासगी रुग्णालये नियम- अटींमध्ये सुरू आहेत. शासकीय रुग्णालयातील उपचार बंद असल्याने रुग्णांना खासगी रुग्णालयाची पायरी चढावी लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशालाही झळ बसत आहे. आता रुग्णालयात दिवसाकाठी 3 ते 4 ऑपरेशन होऊ लागली असल्याचे डॉ. शिवाजी काळगे यांनी सांगितले. वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या प्रत्येकाच्या मनात कोरोनाबाबत धास्ती आहे. परंतु, आर्थिक फटका आणि रुग्णांची होत असलेली गैरसोय यामुळे रुग्णालये सुरू करण्यात आली आहेत.
काचबिंदू म्हणजे काय?
डोळ्याच्या नेत्रगोलातील दाब वाढल्याने डोळ्याच्या ऑप्टिक नर्व्ह म्हणजे डोळ्यापासून मेंदूला जोडणार्या मुख्य मज्जातंतूला हानी पोहचते. त्यामुळे व्यक्तीची दृष्टी हळू-हळू अधू होऊ लागते. डोळ्यांच्या अशा परिस्थितीला काचबिंदू म्हणतात. काचबिंदूचे वेळेत निदान झाले नाही तर, कायमचे अंधत्व देखील येऊ शकते.