लातूर- जिल्ह्यातील निलंगा शहरातील एका व्यापाऱ्याचे हितसंबंध जोपासण्यासाठी एका पोलीस कर्मचाऱ्यांने पदाचा गैरवापर केला आहे. जिल्हाबंदी आदेशाची पायमल्ली करत परळी येथून व्यापाऱ्याच्या मुलीला पोलीस घेऊन आल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलीस, व्यापारी आणि मुलीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करुन तिघांनाही विलगिकरण कक्षात ठेवण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी दिली.
हेही वाचा- पुणे शहरात आज नवीन 75 कोरोनाबाधित रुग्ण आढळले - डॉ. दीपक म्हैसेकर
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर एका बाजूला पोलीस कर्मचारी दिवसरात्र कर्तव्य बजावत आहेत. जिल्हाबंदी आदेशाने काटेकोरपणे पालन करत जिल्ह्यात कोणालाही प्रवेश देत नाहीत.असे चित्र असताना, निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी पोलीस ठाण्याच्या एक पोलीस कर्मचाऱ्यांने नियमाची पायमल्ली करीत व्यापाऱ्याला मदत केली आहे. २२ एप्रिलला या पोलिसाने निलंगा येथील व्यापाऱ्याच्या मुलीला परळी येथून घेऊन आला आहे.
या घटनेची माहिती शेजाऱ्यांना कळताच त्यांनी याची माहिती प्रशासनाला दिली. प्रशासनाने सोमवार (दि. २७) रोजी व्यापारी आणि मुलीला ताब्यात घेतले. त्यांच्यावर जिल्हाबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी निलंगा पोलीसात गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर खबरदारी म्हणून शासकीय विश्रामगृहात व्यापारी आणि मुलीला विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
जिल्हाबंदी असताना, व्यापाऱ्याची मुलगी निलंग्यात कशी आली? याचा शोध घेतला असता, औराद शहाजनी पोलीस कर्मचाऱ्यांने केलेला प्रताप समोर आला. या घटनेबाबत औराद पोलीसांनी दुजोरा दिला असून याचा अहवाल उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे पाठवला असल्याचे सांगितले. याबाबत विचारणा करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता, त्या पोलिसावरही कारवाई झाली असून त्यालाही विलगिकरण कक्षात ठेवले असल्याची त्यांनी माहिती दिली.