लातूर - जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मंगळवारी 4 रुग्णांची भर पडली असून हे सर्वजण इतर जिल्ह्यातून प्रवास करून दाखल झाले होते. त्यामुळे चार दिवसांपूर्वी ग्रीन झोनकडे वाटचाल असणारा लातूर जिल्हा आता रेड झोनकडे मार्गक्रमण करत असल्याचे चित्र आहे.
मंगळवारी लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 67 व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी आले होते. पैकी 61 जणांचे अहवाल हे निगेटिव्ह तर 4 जणांचे अहवाल हे पॉझिटिव्ह आले असून 1 व्यक्तींचा अहवाल प्रलंबित आहे. तर 1 जणांचा अहवाल नाकारण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या ही 33 वर येऊन ठेपली आहे.
बाहेरील जिल्ह्यातून येणारे नागरिकच कोरोना पॉझिटिव्ह आढळत असल्याने योग्य खबरदारी घेणे गरजेचे झाले आहे. नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमध्ये अहमदपूर तालुक्यातील खंडाळी 1, लातूर तालुक्यातील बोरगाव 1, उदगीर शहरातील 1 तर जळकोट येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य विभागावरील ताणही वाढत आहे. अहमदपूरमध्ये नव्यानेच रुग्ण आढळून आल्याने योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. तर, सर्वाधिक रुग्णांची संख्या ही उदगीर शहरात आहे. शहरात 4 कंटेन्मेंट झोन करण्यात आले असून अत्यावश्यक सेवादेखील नगरपालिकेचे कर्मचारी पुरवत आहेत.
लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि उदगीर येथील सामान्य रुग्णालय येथे या रुग्णांवर उपचार सुरू आहेत.