लातूर - रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे नमुने तपासणीतही वाढ झाली आहे. शनिवारी लातूर, बीड, उस्मानाबाद येथून 175 व्यक्तींचे अहवाल तपासणीसाठी दाखल झाले होते. पैकी लातूर जिल्ह्यातून 91 होते. यामध्ये 84 जणांचे अहवाल निगेटिव्ह, 4 जणांचे पॉझिटिव्ह तर तिघांचे अनिर्णित आहेत. त्यामुळे उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ही 43 वर गेली आहे.
जिल्ह्यात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. शनिवारी सलग सहाव्या दिवशी रुग्णांच्या संख्येत भर पडली आहे. यामध्ये अहमदपूर तालुक्यातील पाटोदा येथील व्यक्तीचा समावेश असून रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांची प्रकृती ही गंभीर होती. तर रक्तदाब आणि फुफुसचाही त्यांना त्रास आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असले तरी त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
लातुर येथील 6 वर्षीय मुलीलाही कोरोनाची लागण झाली आहे. तिलाही निमोनिया, ताप असून तिचीही प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. उदगीर येथील 20 पैकी 19 जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत तर एकाला कोरोनाची लागण झाली आहे. रेणापूर येथून 17 व्यक्तींचे अहवाल तपासणीकरीता आले होते. पैकी एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आहे. जिल्ह्यातील 91 पैकी 84 जणांचे अहवाल निगेटिव्ह, 3 व्यक्तींचे अनिर्णित तर 4 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. उदगीरसह लातूर आणि जळकोट शहरात कंटेन्टमेंट झोन वाढविण्यात आले आहेत.
जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात असली तरी रुग्णांची वाढती संख्या ही चिंतेची बाब आहे.