लातूर - कोरोनाच्या लढाईत योद्धा म्हणून लढाणाऱ्या आशा वर्कर, पोलीस कर्मचारी, गावाच्या वेशीवर थांबणारे कोरोना वॉरियर्स यांनाच मारहाणीच्या घटना समोर येत आहेत. रस्त्यावर थुंकल्यास कोरोनाचा धोका निर्माण होतो. त्यामुळे रस्त्यावर थुंकू नकोस, असे सांगणाऱ्या आशा वर्करला व त्यांच्या कुटूंबीयांना मारहाण झाल्याची घटना मोहदळ येथे घडली आहे. या प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
सविता निकम या गेल्या सात वर्षापासून चाकूर तालुक्यातील मोहदळ येथे आशा कार्यकर्ती म्हणून कार्यरत आहेत. सध्याच्या कोरोनाच्या अनुषंगाने घरोघरी जाऊन सर्वे असो की गावात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची नोंद असो यामध्ये आशा वर्कर यांची मुख्य भूमिका राहिली आहे. त्यामुळेच ९० हजार परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांच्या नोंदी होऊ शकल्या आहेत.
असे असताना गावातीलच दिलीप निकम हे ग्रामपंचायत कार्यालयावर जाऊन तंबाखू खाऊन खाली रस्त्यावर थुंकत होता. यामुळे कोरोनाचा धोका निर्माण होऊ शकतो असे करू नको, म्हणून सविता यांनी त्याला बजावले. मात्र, याचाच राग मनात धरून त्याने त्यांच्याशी वाद घातला. तर रात्री मंगेश दिलीप निकम, दिलीप आण्णासाहेब निकम, रतन आण्णासाहेब निकम, रावसाहेब आण्णासहेब निकम, सौदागर निकम, विलास निकम यांनी सविता यांच्या घरी जाऊन आमच्या मुलास का शिवीगाळ केली म्हणून हुज्जत घातली. यामध्ये सविता यांच्या मुलाने आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला असता मुलाला तसेच सविता यांच्या पतीला आणि सासुला या सहा जणांनी धक्काबुक्की केली. शिवाय जीवे मारण्याची धमकीही दिली.
सविता निकम यांच्या तक्रारीवरून चाकूर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.