लातूर - हरयाणा राज्यातील फिरोजपूर झिरका येथे गेल्या तीन महिन्यांपासून धार्मिक कार्यासाठी वास्तव्यास असलेले 12 यात्रेकरू 2 एप्रिलच्या मध्यरात्री करनूल आंध्र प्रदेश येथे जाताना लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे वाट चुकुन आले असल्यचे आढळून आले होते. या बारा जणांच्या स्वॅबची तपासणी केल्यानंतर त्यातील 8 जणांना कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्यावर उपचार करण्यात आले आणि कोरोनाचे अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर पोलिसांनी त्यांना घरी जाण्याची परवानगी दिली आहे.
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना लातूरातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय संशोधन संस्थेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांचा अंतिम अहवाल 18 एप्रिलला निगेटिव्ह आला. त्यानंतर त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. या आठही जणांना निलंगा येथे शासकीय विलगीकरन कक्षात क्वारंटाईन करण्यात आले होते.
यावेळी त्यांना मोबाईलवर प्लाझ्मा थेरपीची माहिती मिळाली. कोरोनातुन बरे झालेल्यांना प्लाझ्मा दान करता येतो, हे कळल्यानंतर त्यांनी तातडीने 'आम्ही प्लाझ्मा दान करण्यासाठी तयार आहोत', अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोचवली. याचा उल्लेख जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी आपल्या फेसबुक लाईव्ह मध्ये केला होता.
लातूरकरांच्या सहकार्यामुळेच आम्ही आठजण कोरोनामुक्त झालो आहोत. हे आम्ही कधीही विसरणार नाही. मदतीची ही भावना मनात ठेवून आमच्यापैकी सात जणांनी प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेतला होता उर्वरित एक हे ज्येष्ठ नागरिक आहेत. मदतीतून कोणाचे तरी जीवन वाचणे आणि माणूस जगणे महत्वाचे आहे, अशी भावना परप्रांतीय यांनी व्यक्त केली होती.
12 मे रोजी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी आपल्या मूळ गावी जाण्यासाठी परवानगी दिल्याने रात्रीच ते आपल्या मूळ गावी निघाले. जाताना ते भावनिक झाले होते त्यांनी जिल्हा प्रशासन, स्थानिक प्रशासनाचे आभार व्यक्त करून लातुरकरांचे हे उपकार आम्ही आयुष्यभर विसरु शकणार नसल्याची भावना व्यक्त केली. मूळ गावी जाता जाता क्वारंटाईन सेंटर येथे प्रार्थना करत जिल्हाधिकारी यांच्यासह जिल्हा व निलंगा प्रशासनाचे आणि निलंग्यातील जनतेचे मानले आभार.