लातूर - दिव्यांगांसाठी विविध योजनांच्या घोषणांचा केवळ पाऊस पाडला जातो. मात्र, प्रत्यक्षात त्यांच्या पदरी काहीच पडत नाही, असा आरोप करत आमरण उपोषणाचा पवित्रा घेतल्याचे दिव्यांगांनी सांगितले आहे. लातूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अपंग हक्क स्वाभिमानी प्रतिष्ठानच्यावतीने हे बेमुदत आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे.
दिव्यांगांच्या मागण्यांकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष होत आहे. तसेच दिव्यांगांना मोठ्या अडचणींचा सामना करून जीवन जगावे लागत आहे. दिव्यांगांना व्यवसाय करण्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात यावी, अशा अनेक मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे बेमुदत उपोषण सुरु आहे.
हेही वाचा... हिंगणघाट जळीतकांडप्रकरणी आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी
दिव्यांगांसाठी ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका व महानगरपालिकेतील ५ टक्के निधी आर्थिक स्वरूपात त्वरित द्यावा. विनाअट घरकुल देण्यात यावे. व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच संजय गांधी निराधार योजनेतील अपंग मासिक वेतन विनाअट लागू करावे. आधार कार्ड काढण्यासाठी लादण्यात आलेल्या जाचक अटी शिथिल कराव्यात. दिव्यांगांना प्रतिमहा ११०० रुपये देऊन वयाची व उत्पन्नाची अट रद्द करावी. वित्त विकास मार्फत त्वरित कर्ज मंजुरी मिळावी. ग्रामीण भागातील रेशन दुकान हे दिव्यांगांनाच द्यावे, यासह इतर मागण्यांसाठी हे आमरण उपोषण सुरु करण्यात आले.
सोमवारपासून हे उपोषण सुरु करण्यात आले असून सरकारविरोधी घोषणाबाजी देखील सुरु आहे. तसेच जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अहेमद हरणमारे यांनी सांगितले.
हेही वाचा... 'एअर इंडिया, रेल्वेप्रमाणे मोदी ताज महाल आणि लाल किल्लाही विकून टाकतील'