लातूर - हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात पाऊस झालाच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या सर्वाला हवामान खातेच जबाबदार आहे. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यासंदर्भात मुरुड पोलीस ठाण्यात तक्रार नमूद करण्यात आली आहे.
पावसाळ्याच्या सुरवातीला हवामान खात्याने ९७ टक्के पाऊस होण्याचा अंदाज वार्तवला होता. त्यानुसार शेतकऱ्यांनी पावसाचे आगमन होताच खरिपाच्या पेरणीला सुरुवात केली. मात्र, पेरणी होताच पावसाने उघडीप दिल्याने खरिपातील सर्वच पिके धोक्यात आहेत. भिसे वाघोली येथील शेतकरी सत्तर पटेल यांनी १० एकरावरील सोयाबीन मोडले होते. लाख रुपये खर्च करून पेरणी केली. मात्र, पदरी काहीच न पडल्याने आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी आज थेट पोलीस ठाणे गाठले. या शेतकऱ्यानी हवामान खात्यावर गुन्हा नोंद करण्याबाबत फिर्याद दिली.
हवामान खाते केवळ बी-बियाणांच्या फायद्यासाठी अशाप्रकारे अंदाज वार्तवत असून यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान होते. शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असल्याची तक्रार सत्तार पटेल, अतुल कुलकर्णी, महारुद्र चौंडे यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. शिवाय चार दिवसांमध्ये गुन्हा दाखल न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी त्रस्त झाले असून अशा प्रकारे रोष व्यक्त केला जात आहे.