लातूर - निलंगा शहरावर सध्या कोरोनाचे संकट आले आसतानाच आवकाळी पावसानेही सुरुवात केली आहे. आज (रविवारी) सायंकाळी साडेसहा वाजता शहरासह परिसरात मोठा आवकाळी पाऊस झाला. संचारबंदीमुळे घरात लॉकडाऊन झालेल्या शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाली शेतावर कापणी करून ठेवलेले ज्वारी आणि फळबागाचे मोठे नुकसान झाले आहे.
काल (शनिवारी) निलंगा शहरात आंध्र प्रदेशातील कर्नुल येथील बारा तबलिगी समाजातले संभाव्य रुग्ण सापडले आणि त्यापैकी 8 जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले. यामुळे निलंगा शहर हे येणाऱ्या १७ एप्रिलपर्यंत शंभर टक्के लॉकडाऊन करण्यात आले आहे. घरातून बाहेर पडले तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.
घराबाहेर न निघण्याचे आदेश असल्याने कोणालाही घराबाहेर पडता येत नाही. त्यामुळे शेतकरीही यात मोठ्या प्रमाणात भरडला जात आहे. पावसामुळे ज्वारीच्या कणसांचे नुकसान झाले आहे. तर वादळी वाऱ्यामुळे फळबागाचेही मोठे नुकसान झाले आहे.