लातूर - अर्थसंकल्पाच्या सुरवातीलाच शेतकऱ्यांसाठीच्या योजनांचा पाढा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वाचला. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढविणार, 20 लाख शेतकऱ्यांना सोलार पंप, 15 लाख कोटींचे कर्ज अशा घोषणांची तरतुद शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने केली आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या मुलभूत समस्या वेगळ्याच असून, हे सरकार आश्वासनांचे गाजर दाखवित असल्याचा आरोप लातूरमधील शेतकऱ्यांनी केला आहे. 'ईटीव्ही भारत'ने शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे.
हेही वाचा - देशात २० लाख शेतकऱ्यांना सोलर पंप देणार - अर्थमंत्री
दुप्पट उत्पन्न, अत्याधुनिक शेती व्यवसाय, झिरो बजेट यासारख्या घोषणा करण्याची ही पहिली वेळ नाही. मात्र, हमीभाव, लातूरच्या पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न मिटवावा यासारखे मुद्दे बाजूला ठेवले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. सध्या रब्बी हंगामातील पीके टँकरच्या पाण्यावर जगवावी लागत आहेत. हरभाऱ्यासारख्या पिकाला हमी भाव मिळत नसल्याच्या संतप्त भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. अर्थसंकल्प हा शेतकऱ्यांच्या बाजूचा नसल्याचे मत लातूरच्या शेतकऱ्यांनी मांडले आहे.
हेही वाचा - अर्थसंकल्प : 99 हजार 300 कोटींची शिक्षण क्षेत्रासाठी तरतूद