लातूर- जिल्ह्यातील बहुतेक शेतकऱ्यांच्या पेरण्या यावेळी वेळेत झाल्या आहेत. मात्र, पेरलेले बियाणे उगवलेच नसल्याच्या अनेक शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत. शेतकऱ्यांच्या तक्रारी पाहता शेतकऱ्यांकडून अर्जही मागवून घेतले जात आहेत. मात्र, केवळ औपचारिकता न करता प्रत्यक्ष मदत शेतकऱ्यांना मिळावी, अशी मागणी छावा संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
पोषक वातावरणामुळे यंदा वेळेत खरिपाच्या पेरणीला सुरुवात झाली. प्रतिकूल परस्थितीमध्येही शेतकऱ्यांनी चाढ्यावर मूठ धरली. मात्र, पेरणी केलेल्या बियाणांची उगवणच झाली नाही. यामध्ये सोयाबीन, मूग, उडीद यासारख्या बियाणांचा समावेश आहे. शेतकऱ्यांच्या वाढत्या तक्रारीनंतर कृषी विभागाकडून अर्ज घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र, हा केवळ दिखाऊपणा न होता शेतकऱ्यांना प्रत्यक्ष पैसे द्यावेत, अन्यथा बियाणांच्या बदल्यात बियाणे द्यावे, अशी मागणी छावा संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
लातूर जिल्ह्यात 65 टक्के खरिपाची पेरणी झालेली आहे. यामध्ये सोयाबीन मुख्य पीक असून त्याचाच अधिकचा पेरा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना पैसे किंवा नुकसानीच्या बदल्यात बियाणे देण्याची मागणी छावा संघटनेच्या वतीने विजयकुमार घाडगे, भगवान माकने, सचिन सूर्यवंशी, सिराज शेख, दीपक नरवडे यांनी केली. आठ दिवसात शेतकऱ्यांना नुकसानभरपाई न मिळाल्यास छावा स्टाईलने आंदोलन केले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.